पंढरीनाथ कुंभार, भिवंडीभिवंडी तालुक्यातील गोदाम परिसरात अवैधरीत्या रासायनिक द्रव्य व पदार्थांचा साठा केला जात असून या अनधिकृत व्यवसायाकडे नारपोली पोलीस स्टेशनचे पोलीस दुर्लक्ष करीत आहेत.तालुक्यातील वळ, पूर्णा व रहानाळ भागांतील गोदामात जास्त रासायनिक साठा ठेवला जातो. हे रासायनिक द्रव्य विशिष्ट तापमानानंतर पेट घेते. काही रासायनिक पदार्थ घातक असल्याने अनेक वेळा आगी लागल्याच्या घटना लागल्या आहेत. हे रसायन कोठून येते, कोणास विकले जाते, याचा तपशील गोदामातील चालकाकडे नसतो. हे विक्रेते काळाबाजार करीत असून त्याकडे शासनाचे विक्री प्रशासन व संबंधित प्रशासनातील इतर अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. अशा वेळेस भिवंडी पालिका अग्निशामक दलाचे अधिकारी याबाबतची माहिती संबंधित शासकीय विभागास कळवत नाहीत, याची पालिका प्रशासनाने चौकशी करून कारवाई केली पाहिजे. तसेच नारपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी या रसायनाचा काळाबाजार करणाऱ्या गोदामचालक-मालकावर कारवाई न करता हा व्यवसाय बंद करीत नसल्याने भविष्यात यात दुर्घटना होऊन मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाणे पोलीस आयुक्तांनी याची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
भिवंडी गोदामात अवैधरित्या रासायनिक द्रव्य, पदार्थांचा साठा
By admin | Updated: November 16, 2014 23:49 IST