मुंबई : साथीच्या आजारांवर उपचार करणारे पाच हजार खाटांचे विशेष रुग्णालय बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी २० एकर जागेचा शोध गेल्या दोन महिन्यांपासून महापालिका करीत आहे. अखेर मुलुंड आणि भांडुप अशा दोन जागांचा पर्याय पुढे आला आहे. त्यानुसार महापालिकेचे अधिकारी लवकरच या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून त्यापैकी सोयीस्कर असलेल्या एका जागेची निवड करणार आहे.साथीच्या आजारांवर उपचार करणारे केवळ १२५ खाटांचे कस्तुरबा रुग्णालय आहे. मुंबईत मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर अशा विशेष रुग्णालयाची आवश्यकता प्रकर्षाने जाणवली. रुग्णांची संख्या एप्रिल-मे महिन्यात वाढत गेल्यामुळे खाटांची कमतरता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती. त्यामुळे जम्बो फॅसिलिटी सेंटर तत्काळ उभारण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत असे विशेष रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.महापालिकेने ३० जुलै २०२० रोजी अभिरुची स्वारस्य मागवले. मात्र१० आॅगस्ट रोजी मुदत संपली तेव्हा केवळ एकच प्रतिसाद आल्याचे आढळून आल्याने निविदेला मुदतवाढ देण्यात आली. मात्र या वेळेस भांडुप आणि मुलुंड अशा दोन जागांचा पर्याय महापालिकेपुढे आला आहे. पालिका अधिकारी लवकरच या दोन्ही जागांची पाहणी करून कोणती जागा रुग्णालयासाठी योग्य आहे, याचा अहवाल तयार करून पालिका प्रशासनाला सादर करणार आहे. त्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय होईल. विशेष म्हणजे हे रुग्णालय संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील रुग्णांसाठी खुले असणार आहे.
साथीच्या आजारांवरील विशेष रुग्णालयासाठी दोन जागांचा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 07:24 IST