Join us  

Sharad Pawar: शरद पवारांची रणनीती; ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर २०२४ च्या निवडणुकीबाबत स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 4:57 PM

जर तुम्ही फिल्डवर राहिलात तरच भाजपा हरेल. जो लढाई लढेल त्यालाच नेतृत्व करायला द्यायला हवे असंही शरद पवारांनी सांगितले आहे.

मुंबई - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) यांनी बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर भेट घेतली. यावेळी ममता यांनी पत्रकारांना राहुल गांधी यांचे नाव न घेता सणसणीत टोला हाणला. आश्चर्याची बाब म्हणजे शरद पवार(Sharad Pawar) यांनीदेखील ममता यांच्या म्हणण्याला खास शैलीत पाठिंबा दर्शविला. ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता कोणताही व्यक्ती काही करत नाही आणि परदेशात जाऊन बसतो, तर काम कसे चालेल? असा सवाल केला.

ममता बॅनर्जींच्या या विधानावर  शरद पवार म्हणाले की, तुम्ही फिल्डवर राहिला नाही तर भाजपा तुम्हाला बोल्ड करेल. जर तुम्ही फिल्डवर राहिलात तरच भाजपा हरेल. जो लढाई लढेल त्यालाच नेतृत्व करायला द्यायला हवे. उद्धव ठाकरेंना बरे नसल्याने ते ममता यांना भेटू शकले नाहीत. संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. ममता बोलल्या ते योग्यच आहे, फिल्डवर राहूनच त्या विजयी झाल्या आहेत, असे म्हणत शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना विरोधकांचे नेतृत्व नको अशी बाजू घेतली आहे.

तसेच पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र जुने नाते आहे. भाजपविरोधात जे एकत्र येतील त्या पक्षांचे स्वागत असेल. भाजपाला देशात सक्षम पर्याय तयार करण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय स्तरावर एकसारखा विचार करणाऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. सगळ्यांनी मिळून भाजपाला सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. २०२४ च्या निवडणुकीत हा पर्याय उपलब्ध हवा. त्यासाठीच आमची भेट झाल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केले.

काँग्रेसला वगळण्याचा प्रश्न नाही

भाजपाविरोधी पक्षांनी एकत्र येत पर्याय उपलब्ध करुन द्यायला हवा. त्यामुळे काँग्रेस आणि इतर पक्षांना वगळण्याचा प्रश्नच नाही. नेतृत्व आमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नाही. सध्या सक्षम पर्याय उपलब्ध करावा. कुणाला वगळण्याचा प्रश्न नाही. सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे. ज्याची मेहनत करायची तयारी आहे. त्यांना सोबत घेऊन पुढे जावं असंही शरद पवारांनी नमूद केले.

टॅग्स :शरद पवारममता बॅनर्जी