Join us

मुंबई सेंट्रल पूरमुक्त करण्यासाठी पंपिंग स्टेशनचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:05 IST

मुंबई : प्रत्येक पावसाळ्यात दक्षिण मुंबईतील गोल देऊळ, अलंकार सिनेमा, मुंबई सेंट्रल या ठिकाणी पाणी तुंबते. या तुंबणाऱ्या पाण्याचा ...

मुंबई : प्रत्येक पावसाळ्यात दक्षिण मुंबईतील गोल देऊळ, अलंकार सिनेमा, मुंबई सेंट्रल या ठिकाणी पाणी तुंबते. या तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सध्याच्या पावसाळी वाहिन्या या खोल बोगद्याद्वारे टाकण्याचा पालिकेचा विचार सुरू आहे. तसेच मुंबई सेंट्रल सध्याच्या हाजीअली पंपिंग स्टेशनमधील जागेत किंवा जवळच्या उद्यानात नव्याने पंपिंग स्टेशन बांधण्यात येणार आहे. या सर्व कामांसाठी २२५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

२६ जुलै २००५ मध्ये मुंबईत ओढवलेल्या पूरपरिस्थितीनंतर राज्य सरकारने स्थापन केलेल्या डॉ. माधव चितळे यांच्या समितीने अहवाल सादर केला. या अहवालातील शिफारशी व सल्लागाराच्या अहवालानुसार गोल देऊळ, अलंकार सिनेमा, अलीभाई प्रेमजी मार्ग, मुंबई सेंट्रल व इतर ठिकाणच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी काही पर्याय सुचवले. परंतु या सल्लागाराने सुचवलेले तिन्ही पर्याय व्यवहार्य व तांत्रिकदृष्ट्या शक्य नाहीत. त्यामुळे या भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी याठिकाणी पर्जन्य जलवाहिनी खोल बोगद्याद्वारे टाकण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला.

बोगदा आणि नवीन पंपिंग स्टेशन या दोन्ही प्रकारच्या कामांचा अभ्यास करण्यासाठी पालिकेने सल्लागाराची नियुक्ती केली आहे. या सल्लागारामार्फत जमिनीखाली युटीलिटीजचा शोध घेऊन काम करताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत, याचा अहवाल तयार केला जाणार आहे. या दोन्ही प्रस्तावांचा अभ्यास करण्यासाठी, रस्त्याखालील विद्युत वाहिन्या, जलवाहिन्या व इतर सुविधा वाहिन्या यांचे नकाशे तयार करणे, नवीन पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असतानाच, येणाऱ्या संभाव्य अडचणींचा अभ्यास केला जाणार आहे.