Join us
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी ग्रामरोजगार सेवकांचा मोर्चा

By admin | Updated: August 6, 2015 01:59 IST

ग्रामरोजगार सेवकांना अर्धवेळ ठरवणारे कायदे रद्द करण्याची मागणी करीत ग्रामरोजगार सेवक संघटनेने आझाद मैदानात धडक मोर्चा काढला

मुंबई : ग्रामरोजगार सेवकांना अर्धवेळ ठरवणारे कायदे रद्द करण्याची मागणी करीत ग्रामरोजगार सेवक संघटनेने आझाद मैदानात धडक मोर्चा काढला. राष्ट्रीय रोजगार हमी कायदा २००५, केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनांननुसार ग्रामरोजगार सेवक हे पूर्णकालीन व शासनाच्या अंमलबजावणी यंत्रणेतील पद असल्याचा संघटनेचा दावा आहे.रोहयो योजनेच्या अंमलबजावणीतील विविध यंत्रणा, कृषी, पाटबंधारे, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत इत्यादी राज्य, जिल्हा व ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणांच्या अंमलबजावणीसाठी ग्रामरोजगार सेवक कार्यरत आहेत. ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या २६ हजार ग्रामरोजगार सेवकांना साधे नेमणूक पत्रही देण्यात आलेले नाही. दुष्काळ निवारणात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. शासनाने ग्रामरोजगार सेवकांना अर्धवेळ ठरवणारे आदेश रद्द करण्याची संघटनेची प्रमुख मागणी आहे. शिवाय ग्रामरोजगार सेवकांना ग्रामपंचायत खात्यावरून मोबदला देण्याचा आदेश रद्द करावा आणि ग्रामपंचायत समितीद्वारे थेट ग्रामरोजगार सेवकांच्या खात्यावर मोबदला, प्रवास खर्च व अन्य सुविधा देण्याची मागणी संघटनेने केली आहे. (प्रतिनिधी)