Join us

जानव्यातील राष्ट्रवादाला विरोध - सबनीस

By admin | Updated: April 24, 2016 02:01 IST

आम्हाला जानव्यातील राष्ट्रवाद नको आहे. हिंदू राष्ट्रवाद पददलितांना दिलासा देऊ शकत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पालकत्व मानणाऱ्या पंतप्रधान मोदींना देशात गांधी-आंबेडकरांचे वावडे

भिवंडी : आम्हाला जानव्यातील राष्ट्रवाद नको आहे. हिंदू राष्ट्रवाद पददलितांना दिलासा देऊ शकत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पालकत्व मानणाऱ्या पंतप्रधान मोदींना देशात गांधी-आंबेडकरांचे वावडे असले तरी परदेशात मात्र ते त्यांचे नाव घेतात. तेथे ते हेडगेवार-गोळवलकर गुरुजींचे नाव घेऊन आपला राष्ट्रवाद का दाखवत नाहीत? अशी परखड भूमिका साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी मांडली.भिवंडीतील बी.एन.एन. कॉलेजच्या मैदानावर पद्मश्री अण्णासाहेब जाधव साहित्यनगरीत भरलेल्या राज्यस्तरीय आंबेडकर साहित्य संमेलनाचे उद््घाटन सबनीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती साजरी करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांची प्रतिमा गोळवलकर गुरुजींच्या शेजारी ठेवली. आंबेडकरांचा फोटो फक्त मतांच्या बेरजेसाठी लावायचा, पण त्यांची मते स्वीकारायची नाहीत. मग, विरोधी विचारांच्या व्यक्तिमत्त्वांच्या पूजेचे दाखवण्यापुरते स्तोम कशासाठी, असा प्रश्न विचारत त्यांनी संघाने बाबासाहेबांच्या केलेल्या पूजेलाच आक्षेप घेतला. संघाच्या विचारधारेत आंबेडकर बसत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमांसमोर मेणबत्त्या लावून उपस्थितांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. या वेळी विचारमंचावर संमेलनाध्यक्ष शुक्राचार्य गायकवाड, स्वागताध्यक्ष सीताराम जाधव, ज्येष्ठ साहित्यिका प्रा. सुशीला मूलजाधव, दामोदर मोरे, भगवान भोईर, ज्येष्ठ नेते गंगाराम इंदिसे, नगरसेवक विकास निकम व आरपीआयचे महेंद्र गायकवाड होते. (प्रतिनिधी)आक्रमक हिंदू राष्ट्रवादाच्या सध्याच्या काळात दलित-पददलितांना संवादाच्या जागा शोधाव्या लागतील. प्रस्थापितांशी केवळ वैर घेऊन चालणार नाही. बाबांनी सत्याग्रहातून सर्वकाही मिळविले. देशाचे सार्वभौमत्व कायम राहावे म्हणून सर्वांना श्रद्धेचे अधिकार संविधानाने दिले आहेत. त्यामुळे एकाच धर्माच्या प्रकाशात ही व्यवस्था राहू शकत नाही. बाबासाहेबांनी प्रस्थापितांचे वर्चस्व खोडून काढले, याचे दाखले सबनीस यांनी दिले. अध्यक्षीय भाषणाची सुरुवात ‘तुझ्या पावलांचे ठसे पाहिले मी, दिशा मज कळाली तसा चाललो मी...’ या काव्यरचनेने करत संमेलनाचे अध्यक्ष शुक्राचार्य गायकवाड यांनी बुद्धांची विचारसरणी ही लोकशाहीची विचारसरणी असल्याचे सांगितले. या संमेलनानिमित्ताने भिवंडीतील धामणकरनाका येथून संविधानाच्या प्रतिकृतीची मिरवणूक काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेल्या माधवी मूलजाधव यांनी, तुझीच कमाई आहे भीमाई, ही जाणीव जानवेवाल्यांना नाही, असे सांगून समाज व देशाच्या उद्धारासाठी साहित्यिकांची आवश्यक्यता असल्याचे प्रतिपादन केले.