Join us

‘कोस्टल’साठी सल्लागार नेमण्यास विरोध

By admin | Updated: November 29, 2015 02:53 IST

कोस्टल रोड प्रकल्पाचा विस्तृत अहवाल आणि निविदेसाठी सल्लागाराची निवड करताना संबंधिताने अशा प्रकाराची कामे यापूर्वी केली आहेत का? किंवा याची चाचपणी करण्यात आली आहे

मुंबई : कोस्टल रोड प्रकल्पाचा विस्तृत अहवाल आणि निविदेसाठी सल्लागाराची निवड करताना संबंधिताने अशा प्रकाराची कामे यापूर्वी केली आहेत का? किंवा याची चाचपणी करण्यात आली आहे का, असे सवाल उपस्थित करीत महापालिकेतल्या विरोधी पक्षांनी कोस्टल रोडसाठी सल्लागार नेमण्यास शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत विरोध दर्शविला.कोस्टल रोडचा प्रस्ताव १ हजार २०० कोटी रुपयांचा असून, याबाबत ग्लोबल टेंडर असताना यासंबंधी आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रात जाहिरात का देण्यात आली नाही? सल्लागारासाठी कोणते निकष ठेवले होते? संबंधिताने यापूर्वी अशा प्रकाराची कामे केली आहेत का, असे सवाल मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित करत यासंबंधीच्या प्रस्तावाला विरोध दर्शवला; शिवाय याचे स्पष्टीकरण देण्यात यावे, असेही म्हटले. राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी या प्रकरणी पालिकेच्या तज्ज्ञ अधिकारी वर्गाचा सल्ला घ्यावा, असे सूचित केले. राष्ट्रवादीचे सदस्य सुनील अहिर यांनी यासंबंधीच्या कामाच्या नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित करीत स्थानिकांचीही मते विचारात घेतली जाणार का, असा सवाल केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनीही सल्लागार नियुक्तीला विरोध दर्शवला. कोळी बांधवांच्या पुनर्विकासाचे काय, असा सवाल करीत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. (प्रतिनिधी)अनुभवास प्राधान्यअतिरिक्त आयुक्त श्रीनिवासन यांनी विरोधकांनी केलेल्या विरोधानंतरही सल्लागाराचा अनुभव पाहून नेमणूक केली जात असल्याचे स्पष्ट केले. शिवाय ज्यांना अनुभव नाही; अशांना बाद करण्यात आल्याचे सांगितले. परिणामी, त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला.