Join us
Daily Top 2Weekly Top 5

नव्या मुख्यालयाला आदिवासी तालुक्यांचा विरोध

By admin | Updated: July 19, 2014 00:35 IST

ठाणे जिल्हा क्षेत्रफळाच्या आणि लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा असून जवळपास ९ हजार ५५८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात तो विस्तारला आहे.

वसंत भोईर, वाडाठाणे जिल्हा क्षेत्रफळाच्या आणि लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा असून जवळपास ९ हजार ५५८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात तो विस्तारला आहे. जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा यासारखे दुर्गम आदिवासीबहुल तालुके त्यात सामावले आहेत. या तालुक्यातील आदिवासी बांधवांना ठाणे येथील जिल्हा अधिकारी कार्यालयात कामासाठी अनेक अडचणी येत होत्या, मात्र विभाजनानेही समस्या सुटणार नसल्याचा आदिवासी संघटनांचा आरोप आहे. वारंवार हेलपाटे मारून अधिकारी त्यांची दखल घेत नव्हते. त्यामुळे आदिवासी बांधव उपेक्षित राहिले आहेत. ते मुख्य प्रवाहात यावे व त्यांचा सर्वांगीण विकास साधला जावा, या हेतूने प्रशासनाने जिल्हा विभाजन केले आहे. परंतु, पालघर मुख्यालय केल्याने आदिवासी बांधव मुख्य प्रवाहापासून दूरच राहतील, असा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे. आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घाईघाईने विभाजनाचा निर्णय घेऊन आदिवासी बांधवांची दिशाभूल केल्याचा आरोप संघटनांनी केला.जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, तलासरी आदी पाच तालुक्यांतील पंचायत समित्यांनी ठराव घेऊन मुख्यालयाला व पंचायत समित्या बरखास्तीच्या निर्णयाला विरोध केला आहे. दरम्यान, भूमीसेनेचे संस्थापक अध्यक्ष काळुराम दोधडे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन मुख्यालयाला विरोध दर्शवला आहे. जव्हारचे माजी नगराध्यक्ष राजाराम मुकणे यांनी यासंदर्भात न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगून मुख्यालयाला कडाडून विरोध केला.