Join us
Daily Top 2Weekly Top 5

संधी कला आणि वाणिज्यमधील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 23:54 IST

दहावी, बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला की पाल्याला किती टक्के मिळाले आहेत, त्यावर त्याच्या पुढच्या करिअरसाठी कोणती शाखा निवडायची याचा निर्णय घेतला जातो.

दहावी, बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला की पाल्याला किती टक्के मिळाले आहेत, त्यावर त्याच्या पुढच्या करिअरसाठी कोणती शाखा निवडायची याचा निर्णय घेतला जातो. आताचे विद्यार्थी शाळांऐवजी क्लासेसमध्येच जास्त वेळ असतात. शिवाय, ‘दहावी-बारावीनंतर पुढे काय?’ यावर व्याख्यानेही वरचेवर होत असतात. त्यामधून त्यांना दहावीनंतर पुढे कोणती शाखा निवडायची याची जुजबी माहिती झालेली असते. आपल्याला जे क्षेत्र निवडायचे असेल त्याचे सखोल ज्ञान दहावीलाच असणे गरजेचे असते.म्हणजे अकरावीत जाताना कोणती शाखा निवडावी याचा जास्त विचार करावा लागत नाही. मात्र दहावीच्या परीक्षेत जर कमी टक्के मिळाले असतील तर त्याच्यासमोर जास्त पर्याय नसतात. तरीही आपल्या आवडीचे क्षेत्र निवडता येते. याचे एक चांगले उदाहरण म्हणजे, कलाशाखेतून डॉक्टरही बनता येते. मानसशास्त्र हा विषय घेऊन मानसोपचारतज्ज्ञ बनता येते. दहावीनंतर ज्ञानशाखांचा विस्तार कशा प्रकारे होतो, त्यांच्या उपशाखा कोणत्या आहेत, याचा विचार केला तर दहावीनंतर कला, विज्ञान, वाणिज्य आणि तांत्रिक (ळीूँ) अशा चार प्रमुख शाखा आहेत. त्यातील आज आपण कला आणि वाणिज्य शाखेविषयी माहिती घेऊ या.या लेखमालेतून दहावी, बारावीनंतरच्या विविध ज्ञानशाखा, स्पर्धापरीक्षा, अभ्यासकौशल्य, कलाकौशल्य, तांत्रिक शाखा, सैन्यदलातील संधी, तंत्रज्ञान व संगणक शिक्षण अशा विविध पर्यायांचा विचार केला जाणार आहे. वाचक, पालक आणि पाल्य यांना त्याचा नक्कीच उपयोग होईल.कला शाखाकला शाखेत अकरावी प्रवेश घेतल्यावर बारावीपर्यंत मराठी, इंग्रजी, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, सामाजिक शास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल या विषयांचा अभ्यास केला जातो. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, भाषा (मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत आदी), सामाजिक शास्त्र, भूगोल आदी विषयांतून बी.ए. करता येते. याशिवाय, कलाशाखेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे डीएड, बीएसएलएलबी, आयटीआय असे कोर्सही करता येतात. पूर्वी शिक्षकीपेशासाठी कलाशाखा निवडली जायची किंवा साहित्याचा अभ्यास वा वर यादीत दिलेल्या एखाद्या विशिष्ट विषयातील सखोल मास्टरीसाठी बी.ए., एम.ए. केले जायचे. पण आता केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोगाला प्राधान्य देणारे विद्यार्थी जाणीवपूर्वक कलाशाखेत प्रवेश घेतात. त्यामुळे पूर्वीच्या समजाप्रमाणे कमी गुण मिळाले म्हणून आता कुणी कलाशाखेकडे जात नाही, ८०-९० टक्के गुण मिळविणारे विद्यार्थीही कलाशाखेत मुद्दामहून प्रवेश घेतात.वाणिज्य शाखाआकडेमोड, व्यापार, बँकिंग क्षेत्र, वित्तीय क्षेत्र, हिशेब तपासनीस, क्लार्क यांच्यासाठी वाणिज्य शाखा आहे, असा जो गैरसमज होता, तो आता बऱ्यापैकी दूर झालेला आहे. तथापि, या शाखेत व्यवसाय आणि वित्तीय या दोन प्रमुख बाबी अभ्यासल्या जातात. यात अर्थशास्त्र, करप्रणाली, वाणिज्य संघटन, अकाउंटन्सी, आॅडिटिंग, गणित, चिटणीसाची कार्यपद्धती, कॉस्टिंग या विषयांचा प्रामुख्याने अभ्यास होतो. अलीकडच्या काळात सरकारच्या वेगवेगळ्या आर्थिक बदलांमुळे व वेगवेगळ्या करप्रणीलीमुळे वाणिज्य शाखेतही सकारात्मक आव्हान निर्माण झाले आहे. अर्थतज्ज्ञ बनविणारी ही ज्ञानशाखा आहे. वाणिज्य शाखेच्या पदवीधरांसाठी विविध कोर्सेसचा पर्याय उपलब्ध असतो. यात व्यवस्थापन, चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, एम.कॉम. यांचा अंतर्भाव असतो. बारावीनंतर बीकॉम, आयसीडब्ल्यूए, सीएफए हे कोर्सेस करता येतात. विशेष म्हणजे बी.कॉम. करत असताना आयसीडब्ल्यूए, सीएफए हे कोर्सेस करता येतात. त्यानंतर कॉस्ट अकाउंटंट व चार्टर्ड फायनान्शियल अ‍ॅनालिस्ट म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध होते. याव्यतिरिक्त विविध सर्टिफिकेट कोर्सेस आणि डिप्लोमाही करता येतो. यात डिप्लोमा इन अकाउंटन्सी, डिप्लोमा इन सेक्रेटरियल प्रॅक्टिस, डिप्लोमा इन कॉमर्स, पर्सनल सेक्रेटरी, सर्टिफिकेट कोर्स इन बूककिपिंग अ‍ॅण्ड अकाउंटन्सी यांचा समावेश असतो.