Join us

शहरातील रस्त्यांच्या खोदकामाला विरोध

By admin | Updated: March 30, 2015 22:25 IST

शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले असताना नगरपरिषद महावितरण, महानगर गॅस, रिलायन्स फोर जी आदींना रस्ते खोदण्याची परवानगी देत आहे.

पनवेल : शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले असताना नगरपरिषद महावितरण, महानगर गॅस, रिलायन्स फोर जी आदींना रस्ते खोदण्याची परवानगी देत आहे. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी तर होणार आहे तसेच पादचाऱ्यांना चालणेसुद्धा मुश्कील होणार आहे. तरी सदर खोदकामाला परवानगी देऊ नये, अशी मागणी शिवसेना पक्षप्रतोद रमेश गुडेकर यांच्यासह नगरसेवक प्रथमेश सोमण यांनी केली आहे. शहरातील अनेक रस्त्यांची खोदकामे सुरु असून कित्येक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्याचप्रमाणे यापूर्वी करण्यात आलेले भूमिगत गटारे, मलनि:सारण वाहिन्या, पाण्याच्या पाईपलाईन आदींसाठी खोदलेल्या रस्त्यांची अजूनही डागडुजी करण्यात आली नाही. त्यातच आता नव्याने महानगर गॅस, महावितरण, रिलायन्स फोर जी आदींना रस्ते खोदण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी म्हणजे सर्वसामान्य जनतेसाठी अन्यायकारक असून यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना रस्त्यावरुन चालणे मोठे मुश्किलीचे बनले आहे. त्यामुळे सदर रस्ते खोदण्यापूर्वी महावितरण, नगरपरिषद, महानगर टेलिफोन, वाहतूक पोलीस यांची समिती नेमून त्याप्रमाणे कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन पनवेलच्या नगराध्यक्षा चारुशीला घरत यांना नुकतेच शिवसेना पक्षप्रतोद रमेश गुडेकर यांच्यासह शिवसेना नगरसेवक प्रथमेश चंद्रशेखर सोमण व उपविभाग प्रमुख मंदार काणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिले आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.