नवी मुंबई : शहराचा विकास हाच आमचा ध्यास आहे. मात्र विरोधकांनी नेहमीच विकासकामांत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले तरी जनतेला दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण केली आहेत. शहराला जागतिक दर्जाचे शहर करण्याचे आमचे स्वप्न आहे. येत्या काळात ते पूर्ण करू, अशी ग्वाही ऐरोली विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप नाईक यांनी दिली.नाईक यांनी सोमवारी कोपरखैरणे विभागात प्रचार फेरी काढून जनतेशी संवाद साधला. कोपरखैरणेतील प्रभाग क्र. २७, २८ आणि २९ या भागात प्रचार फेरी काढण्यात आली होती. त्यावेळी चौकाचौकांत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. विरोधकांनी नेहमीच विकासकामांविरोधात जनतेमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम केले आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. घराणेशाहीचा बिनबुडाचा आरोप आमच्यावर करण्यात येतो. परंतु माझी उमेदवारी ही जनतेच्या आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार असल्याचे नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. गावातील ग्रामस्थांनी आणि इतर सर्व घटकांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी विधानसभेत अविरत पाठपुरावा केला. या बांधकामांना संरक्षण देण्यास मान्यता मिळविली आहे. खरे तर हा निर्णय अगोदरच झाला असता, मात्र केवळ श्रेय घेण्याच्या स्वार्थापोटी काँग्रेसच्या मंडळींनी त्यात खोडा घातला. राजकीय स्वार्थापोटी आपल्यामध्ये भांडणे लावण्याचे उद्योग ही मंडळी करीत असून त्यांच्या भूलथापांना आणि प्रलोभनांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कष्टकरी आणि माथाडी कामगारांना विरोधकांकडून अनेक खोटी आश्वासने दिली जात आहेत. घरे तोडण्याच्या धमक्या दिल्या जातात. परंतु जोपर्यंत गणेश नाईक आणि संदीप नाईक आहेत तोपर्यंत तुमच्या घरांनाच काय, परंतु या घरांच्या एका विटेलाही धक्का लागू देणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला. (प्रतिनिधी)
विकासकामांत विरोधकांचे अडथळे
By admin | Updated: October 8, 2014 01:34 IST