Join us  

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे स्थानकांवर ‘ऑपरेशन बॉक्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 6:03 AM

फलाटावरील स्टॉल्स, रेल्वे डबे, कचरापेट्यांची तपासणी : साध्या वेशातील पोलिसांचे प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष

मुंबई : देशभरात निवडणुकीचे वारे आहेत. या वेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी मुंबईत हाय अलर्ट असून सर्वत्र बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. उपनगरीय रेल्वे स्थानकांवरही रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी आणि अधिकारी वाढविले असून मॉक ड्रिल सुरू आहे. तसेच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘ऑपरेशन बॉक्स’ सुरू आहे.

दोन महिन्यांपूर्वी देशाच्या सीमेवर तणावपूर्ण वातावरण होते. या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून रेल्वे स्थानकावर चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. अतिरेक्यांकडून कोणत्याही रेल्वे स्थानकावर घातपात होण्याची शक्यता असल्यामुळे सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

रेल्वे स्थानकांवर सध्या ‘आॅपरेशन बॉक्स’अंतर्गत स्टॉल्स, रेल्वे डबे, कचरापेट्यांची तपासणी करण्यात येत आहे. हमाल, सफाई कामगार यांना कोणतीही संशयास्पद वस्तू दिसल्यास रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांस कळविण्यास सांगितले आहे, असे मध्य रेल्वे आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. काही पोलीस साध्या वेषात रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेवर तसेच प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, असे अधिकाºयांनी सांगितले.सीएसएमटी स्थानकावरील सुरक्षेत वाढछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हे मुंबईतील ऐतिहासिक व मोठे स्थानक आहे. मध्य रेल्वेचे मुख्यालयही येथे आहे. या स्थानकावरून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे त्यांच्या व स्थानकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्थानकावर बॅग स्कॅनर कार्यरत असून, येण्या-जाण्याच्या जागेत काही बदल करण्यात आले आहेत. मेटल डिटेक्टरची जागा बदलून मुख्य प्रवेशद्वारावर ठेवण्यात आली आहे.

 

टॅग्स :लोकलपोलिस