Join us

वैतरणातून खुलेआम वाळूची तस्करी

By admin | Updated: February 15, 2015 23:09 IST

येथील वैतरणा नदीपात्रातील वाळू व शहापूर वन विभागातील अजनूप, शिरोळ, टेंभा या भागांतून वृक्षांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे़

श्याम धुमाळ, कसारायेथील वैतरणा नदीपात्रातील वाळू व शहापूर वन विभागातील अजनूप, शिरोळ, टेंभा या भागांतून वृक्षांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे़ यामुळे वनसंपदेचा ऱ्हास होत आहेच, परंतु मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा नदीपात्राची क्षमता धोक्यात आली आहे.याबाबत स्थानिक वन विभाग व मुंबई मनपाचे अधिकारी कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नसून तस्कर व त्यांच्यात अर्थपूर्ण व्यवहार होत असल्याने कारवाई टाळली जाते आहे़ तर हा प्रकार महानगरपालिका मुंबई यांच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगून महसूल यंत्रणा कारवाई करण्याचे टाळत आहे़ अजनूप (शिरोळ) येथून १० किमी अंतरावरील वैतरणा धरणाचे पात्र मोठे आहे़ शहापूर तालुक्यातील टेंभा या ठिकाणी तर नदीची मोठी व्याप्ती आहे. मात्र, या नदीपात्रातून अजनूप ते टेंभा या गावांदरम्यान सुमारे १४ मशिनरी पंप लावून रेतीचा अवैध उपसा करून ती रेतीची विक्री केली जात आहे. दर दिवसा ८ ते १० ट्रक रेतीची तस्करी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. या वाळूमाफियांमार्फत आसपासच्या घनदाट जंगलातील साग, खैर, धावडा व अन्य मौल्यवान झाडांची कत्तल केलेली झाडे रेतीच्या ट्रकमधून लंपास केली जात असून या तीव्र जंगलतोडीकडे वन विभाग शहापूर यांचे सपशेल दुर्लक्ष असल्याने वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अजनूप, शिरोळ कार्यक्षेत्रात मुख्य रस्त्यावर २ वनसंरक्षक चौक्या आहेत़ तर तर टेंभा, वैतरणा ते खर्डी या मार्गावरून ३ वनसंरक्षक चेकपोस्ट असताना या मार्गावरून म्हणजे अजनूप (भेरेपाडा) मार्गे शिरोळ, शहापूरमार्गे रेतीच्या गाड्या व जंगलतोड केलेल्या गाड्या रवाना होत असतात. तर टेंभा (वैतरणा) खर्डी-शहापूरमार्गे रेती व जंगलतोडीच्या गाड्या व्यावसायिक कारणास्तव रवाना होतात. परिणामी, चेकपोस्ट, पोलीस चौक्या, तलाठी कार्यालय, मंडल अधिकारी कार्यालय हे मुख्य रस्त्यावर असतानादेखील वाळू व जंगलमाफियांवर कारवाई होत नसल्याने सर्वसामान्यांत नाराजीचे सूर उमटत आहेत़