वसई : रेल्वे मंत्रालयाने वसई-विरार भागातील रेल्वे प्रवाशांसाठी विविध प्रकल्प हाती घेतले असून सुमारे १२ हजार कोटी रू. ची तरतुद करण्यात आली आहे. रेल्वे व महानगरपालिकेने एकत्रितपणे काम केल्यास या भागातील नागरीकांना नक्कीच दिलासा मिळू शकेल असे उद्गार पालघरचे खा. अॅड. चिंतामण वनगा यांनी रविवारी नायगांव येथे एका उद्घाटन सोहळ्यात काढले.गेली अनेक वर्षे रखडलेले नायगांव परिसरातील पूर्व-पश्चिम भागास जोडणाऱ्या रेल्वेच्या भुयारी मार्गाचे काम नुकतेच मार्गी लागले. या पुलाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये बोलताना अॅड. वनगा म्हणाले, विरार-चर्चगेट कॉरीडॉर, विरार-डहाणू चौपदरीकरण, फलाटाची उंची वाढवणे, रेल्वेस्थानकाचे नुतनीकरण करणे व अन्य विकासकामांसाठी रेल्वेमंत्रालयाने १२ हजार कोटी रू. ची तरतूद केली आहे. ही विकासकामे लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी रेल्वे प्रशासन व स्थानिक महानगरपालिका यांनी संयुक्तरित्या काम केल्यास येथील नागरीकांना नक्कीच दिलासा मिळू शकेल. वसईचे आ. हितेंद्र ठाकूर आपल्या भाषणात म्हणाले, या परिसरातील रेल्वेस्थानकाची स्वच्छता व अन्य कामासाठी महानगरपालिका आपले सहकार्य देऊ करेल यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने महानगरपालिकेशी संपर्क साधावा. या सोहळ्यास माजी खा. बळीराम जाधव, महापौर नारायण मानकर, पश्चिम रेल्वेचे क्षेत्रिय प्रबंधक शैलेंद्रकुमार व अन्य मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नायगांवला भुयारी मार्गाचे उदघाटन
By admin | Updated: March 9, 2015 22:53 IST