Join us
Daily Top 2Weekly Top 5

पालिका उद्यानांतील 'ऍम्फीथिएटर्स' कलाकारांसाठी खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:11 IST

 काळाघाेडा येथे कलाकारांसाठी खुले रंगमंच सुरु केल्यानंतर आता महापालिकेच्या उद्यानांमधील 'ऍम्फीथिएटर्स' चे द्वारही उघडणार आहे.

मुंबई - काळाघाेडा येथे कलाकारांसाठी खुले रंगमंच सुरु केल्यानंतर आता महापालिकेच्या उद्यानांमधील 'ऍम्फीथिएटर्स' चे द्वारही उघडणार आहे. अशा खुल्या नाट्यगृहांची यादीच मुंबई कला, संगीत व संस्कृती आयोगाला सादर करण्यात आली आहे. या नाट्यगृहाच्या सफाईचे काम सध्या सुरु असून लवकरच कलाकारांना त्यांची कला येथे सादर करता येणार आहे. 

महापालिकेने काळा घोडा येथे नवीन कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी रंगमंच उपलब्ध करून दिला आहे. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी स्थापन करण्यात आलेल्या मुंबई कला, संगीत व संस्कृती आयोगाने खुल्या नाट्यगृहांची नियमित सफाई व त्या परिसरातील कलाकारांना त्यांच्या कलांचे सादरीकरण करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याची सुचना केली होती. त्यानुसार महापालिकेच्या २८ उद्यानांमधील खुल्या नाट्यगृहांमध्ये कलाकारांसाठी व्यासपीठ उपलब्ध करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या नाट्यगृहांची एकूण चार हजार २६० आसन क्षमता आहे. 

गायक, वादक, नृत्यसाधक यांना या खुल्या नाट्यगृहामध्ये आपली कला सादर करता येणार आहे. मात्र यासाठी पालिका प्रशासन व 'मुंबई कला, संगीत व संस्कृती आयोग' यांच्या स्तरावर  नाव नोंदणी आणि शुल्क आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर संबंधित विभाग कार्यालयातील उद्यान खात्याची परवानगी संबंधितांना घ्यावी लागेल, अशी माहिती उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. 

-  महापालिकेच्या उद्यानांमध्ये २८ खुली वर्तुळाकार नाट्यगृहे आहेत. या नाट्यगृहांमध्ये कलाकारांना त्यांच्या कला सादर करण्यासाठी वर्तुळाकार किंवा अर्ध वर्तुळाकार मंच उपलब्ध आहे. तर त्या मंचाभोवती बसून कलेचा आस्वाद घेण्यासाठी वर्तुळाकार किंवा अर्ध वर्तुळाकार आसन व्यवस्था आहे. 

- या खुल्या नाट्यगृहांमधील आसन व्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणी रसिकांना बसण्यासाठी खुर्च्यांऐवजी बांधलेल्या वैशिष्ट्यपूर्ण पाय-या आहेत. तसेच रसिकांना ऐसपैसरित्या बसता यावे, यासाठी या पाय-यांची रुंदी अधिक ठेवण्यात आली आहे.

-  या नाट्यगृहांची आसन क्षमता ही त्यांच्या - त्यांच्या आकारानुसार ५० आसनांपासून ५०० आसनांपर्यंत आहे. अशाप्रकारे सर्व नाट्यगृहांची एकूण आसनक्षमता सुमारे चार हजार २६० एवढी आहे. 

-  कुपरेज उद्यान, कुलाबा स. का. पाटील उद्यान, गिरगांव कमला नेहरु उद्यान, मलबार हिल जोसेफ बाप्टिस्टा उद्यान, माझगांव चित्रकार दीनानाथ दलाल उद्यान, दादर शहीद हेमंत करकरे उद्यान, जोगेश्वरी पूर्व महाराणा प्रताप उद्यान, कांदिवली (पू), अशा काही उद्यानांमध्ये खुली नाट्यगृहे आहेत. 

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका