महाड : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामधील नाट्यगृह अखेर महाडकरांसाठी खुले करून दिल्यामुळे नाट्यप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या स्मारकाचा ताबा असलेल्या डॉ. आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था पुणे (बार्टी) या व्यवस्थापनाने नाट्यगृह महाडकरांना उपलब्ध करून देण्यात बंदी केल्याच्या निषेधार्थ महाडमधील नागरिकांनी या विरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे.राज्य शासनाने २० कोटी रुपये खर्चून महाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारलेल्या डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक स्मृती स्मारकामध्ये असलेले वातानुकूलित सुसज्ज नाट्यगृह गेल्या दीड दोन वर्षांपासून उपलब्ध करून दिले जात नव्हते. त्यामुळे शहरातील नाट्यप्रेमींमध्ये बार्टी संस्थेच्या या मनमानीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. शहरात इतके देखणे नाट्यगृह असतानाही अनेक संस्थांना आपापले सांस्कृतिक कार्यक्रम तसेच व्यावसायिक कार्यक्रम, उघड्या मैदानावर करावे लागत होते. हे नाट्यगृह महाडकरांसाठी उपलब्ध व्हावे यासाठी महाडमधील नागरिक एकवटून एक संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. मागील महिन्यात दलितमित्र मधुकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, सेवाभावी संस्था, पत्रकार संघटना तसेच महाडकर नागरिकांचा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला होता. या मोर्चानंतर शासकीय पातळीवर सूत्र हलली आणि अखेर महाडकरांसाठी हे नाट्यगृह कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्यात आले. कालच या नाट्यगृहात कळत नकळत या व्यवसायिक नाटकाचा प्रयोग झाला. महाडकरांसाठी हे नाट्यगृह खुले करण्यात आल्याने नाट्यप्रेमी मंडळींनी समाधान व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)
स्मारकातील नाट्यगृह खुले
By admin | Updated: April 26, 2015 22:28 IST