Join us  

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खुले करा, नागरिकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 2:24 AM

  येथे सकाळी व्यायाम करण्यासह जॉगिंगसाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विशेषत: स्थानिकांचा यात मोठा समावेश आहे. लॉकडाऊनमुळे हे उद्यान बंद आहे.

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली जात असतानाच आता मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरीवली पश्चिमेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानदेखील खुले करण्यात यावे, अशा आशयाची मागणी जोर धरू लागली आहे. तर दुसरीकडे उत्तर मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. अशावेळी येथील हेच उद्यान नागरिकांसाठी खुले करणे कितपत योग्य आहे, असा सवाल केला जात आहे.  येथे सकाळी व्यायाम करण्यासह जॉगिंगसाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विशेषत: स्थानिकांचा यात मोठा समावेश आहे. लॉकडाऊनमुळे हे उद्यान बंद आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता येत असल्याने हे उद्यान पुन्हा खुले करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत सरकारने सामाजिक अंतर पाळत मॉर्निंग वॉकसह व्यायामाची परवानगी दिली आहे. बोरीवली येथील हे उद्यान बंदच आहे.येथे सरासरी ६ हजार जण भेट देतात. यातील बहुतांश लोक हे घोळक्याने येतात. अशा वेळी उद्यान सुरू करणे योग्य नाही, असेही मत नोंदविले जात आहे. दुसरीकडे उद्यान सुरू करायचे की नाही? हा निर्णय पूर्णपणे वन विभाग घेणार आहे. परिणामी, वन विभाग याबाबत नक्की काय आणि केव्हा निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उत्तर मुंबई येथील भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनीदेखील उद्यान सुरू करण्यात यावे, अशी मागणी सरकारकडे केली आहे.गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बंद आहे. अशावेळी स्थानिकांनी जॉगिंगसाठी, व्यायामासाठी हे उद्यान सुरू करण्याची मागणी केली आहे. कदाचित ती योग्य आहे. परवानगी मिळाली तरी मला असे वाटत नाही की लोक एकत्र येतील किंवा घोळक्याने एकत्र येतील. ते सुद्धा नियम पाळतीलच. स्थानिकांच्या मागणीचा विचार व्हावा.- झोरू बथेनाबोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजे उद्यान नाही हे पहिले लक्षात घ्या. हे एखाद्या जंगलासारखे आहे. गेल्या ३ महिन्यांतील लॉकडाऊनमुळे येथील शांतता वाढली आहे. येथील वन्यजीवांना आता पूर्वीसारखी माणसांची सवय राहिली नसेल. परिणामी, उद्यान केव्हा खुले करायचे? हा नंतरचा भाग आहे. मात्र उद्यान खुले करताना वन विभागाने तज्ज्ञांशी बोलावे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उद्यान जरी खुले केले तरी आता वाहनांना प्रवेश देऊ नये. केवळ आतापुरते नाही, तर कायमस्वरूपी येथे वाहनांना प्रवेश नाकारावा. तरच येथील पर्यावरण टिकून राहील.- गोपाल झवेरी

टॅग्स :मुंबई