Join us

स्वत: काळजी घेणे हाच उपाय

By admin | Updated: December 29, 2014 02:39 IST

टीबी हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे एखाद्या टीबी रुग्णाकडून दुसऱ्या व्यक्तीला टीबीची लागण सहज होऊ शकते.

मुंबई : टीबी हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे एखाद्या टीबी रुग्णाकडून दुसऱ्या व्यक्तीला टीबीची लागण सहज होऊ शकते. टीबी रुग्णाने मध्येच औषधे सोडल्यास त्याचा आजार वाढतो. समुपदेशनाद्वारे टीबीला प्रतिबंध घालणे सोयीचे ठरते. पण टीबीला खऱ्या अर्थाने रोखायचे झाल्यास रुग्णाने स्वत:च स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.टीबीची लागण झाल्याचे कळल्यावर अनेक व्यक्ती मुळापासून हादरतात. त्यांना काय करावे, हे कळतच नाही. पण, अशावेळी त्यांना नातेवाईकांनी, मित्र - मैत्रिणींनी साथ देणे गरजेचे आहे. तसेच रुग्णांनी स्वत:ची काळजी स्वत: घेतली पाहिजे. टीबीवर मात करण्यासाठी रुग्णाने स्वत: प्रयत्न केले पाहिजेत. रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवल्यास टीबीचा आजार बळावत नाही, ही गोष्ट रुग्णांनी लक्षात घेऊन त्यानुसार आहार, व्यायाम केला पाहिजे, असे डॉक्टरांचे मत आहे. टीबी रोखण्यास जनजागृतीसाठी ‘मे आय हेल्प यू’ नावाने एक मोहीम सुरू जात आहे. रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यावर टीबीचा जीवाणू सक्रिय होतो. या जीवाणूने शरीरात प्रवेश केल्यानंतर रक्ततपासणी केल्यास त्याला लेटंट टीबी झाल्याचे स्पष्ट होते. पण यावेळी त्या व्यक्तीने रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवल्यास त्याला टीबी होणार नाही, याविषयी मोहीमेतंर्गत जनजागृती केली जाते, असे शिवडी टीबी रुग्णालयाचे डॉक्टर ललित आनंदे यांनी सांगितले. रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी प्रोटीन, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी योग्य प्रमाणात घेण्याची आवश्यकता आहे. पण, बदलेल्या जीवनशैलीमुळे आहारात बदल झाले आहेत. यामुळे शरीरास आवश्यक असणारे घटक मिळत नाहीत. रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवण्यासाठी आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. प्रोटीनसाठी अंडी, दूध, डाळी खाल्ल्या पाहिजेत. केळी, लिंबू, भाकरी आणि पारंपरिक पदार्थांचे सेवन केले पाहिजे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते, असे डॉ. आनंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)