नवी मुंबई : महापालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चेसाठी ठेवलेल्या दोन दिवस विशेष सर्वसाधारण सभेत ८५ पैकी फक्त सहा जणांनीच चर्चेत सहभाग घेतला. नगरसेवक वेळेवर न आल्यामुळे दोन्ही दिवस सभा तब्बल दोन तास उशिरा सुरू झाली. तर अर्थसंकल्प मंजुरीसाठी कोरम पूर्ण करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली. महापालिकेची स्थापना झाल्यापासून सर्वात निराशाजनक चित्र असल्याचे मत ज्येष्ठ लोकप्रतिनिधींनी व नागरिकांनी व्यक्त केले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी २ मार्चला विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा अर्थसंकल्प होता. परंतु या चर्चेकडे सर्वपक्षीय नगरसेवकांनी सपशेल पाठ फिरविल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. पहिल्या दिवशी ११ ऐवजी १ वाजता सुरू झालेल्या सभेला ३९ सदस्य उपस्थित होते. सभा संपेपर्यंत ही संख्या ११ पर्यंत खाली आली. कमी संख्याबळामुळे चर्चेसाठी एक दिवस वाढविण्यात आला. मंगळवारीही नगरसेवक वेळेवर हजर झाले नाहीत. सभा पुन्हा दोन तास उशिरा सुरू झाली. महापौरांसह फक्त २८ जण सभागृहात होते. यामध्ये शिवसेनेचे दोन सदस्य होते. काँगे्रसचा एकही सदस्य उपस्थित नव्हता तर भाजपाच्या एकमेव नगरसेविकाही हजर नव्हत्या. सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसचेही अनेक नगरसेवक अनुपस्थित होते. दुसऱ्या दिवशी सभागृह नेते अनंत सुतार व महापौर सागर नाईक या दोघांनीच मनोगत व्यक्त करून अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. सभेचे कामकाज सुरू करण्यासाठी कोरम पूर्ण करताना राष्ट्रवादीचे पक्ष प्रतोद विनीत पालकर यांचीही दमछाक झाली. वारंवार सदस्यांची संख्या मोजून ते सभागृहाबाहेर जात. बाहेर जाऊन पक्षाच्या नगरसेवकांना पालिकेत येण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचे चित्र दिसू लागले होते. सभागृह नेते अनंत सुतार यांनी नगरसेवकांच्या अनुपस्थितीविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षाने अर्थसंकल्पामधील चुका निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत. परंतु विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील व विठ्ठल मोरे यांच्या व्यतिरिक्त कोणीच हजर नसल्याची खंत व्यक्त केली.उत्पन्नामध्ये कशी वाढ करायची याविषयी सूचना करणे आवश्यक होते. परंतु दुर्दैवाने तसे झाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)सर्वात कमी प्रतिसादच्महापालिकेची पहिली निवडणूक १९९५ मध्ये झाली. तेव्हापासून २० वर्षे अर्थसंकल्पावर सर्वच राजकीय पक्षाचे नगरसेवक मत व्यक्त करतात. अनेक वेळा स्थायी समिती व सर्वसाधारण सभेमध्ये दोन ते तीन दिवस कामकाज सुरू ठेवावे लागत होते. अनेक वेळा रात्री ९ व १० वाजेपर्यंत कामकाज सुरू ठेवले जात होते. परंतु पहिल्यांदाच सर्वात कमी नगरसेवकांनी चर्चेत सहभाग घेतला.विरोधी पक्षांवर टीकाच्सभागृह नेते अनंत सुतार यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली.काँगे्रसचे नगरसेवक सभेकडे फिरकले नाहीत. शिवसेनेच्या दोनच सदस्यांनी सहभाग घेतला. विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील व विठ्ठल मोरे यांनी चांगले मुद्दे उपस्थित केले परंतु त्यांचे सहकारीही भाषण ऐकण्यास थांबले नसल्याचे निदर्शनास आणून दिले तर अपक्ष नगरसेविका गौतमी सोनावणे यांनी दीड तास केलेल्या भाषणाचे त्यांनी कौतुक केले. सहापैकी चौघांनी मत मांडलेच्अर्थसंकल्पावर साबू डॅनियल, गौतमी सोनावणे, विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील, सभागृह नेते अनंत सुतार व महापौर सागर नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. या चौघांनीही एक तासपेक्षा जास्त वेळ अर्थसंकल्पातील त्रुटी व चांगल्या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या. उर्वरित ७९ नगरसेवकांपैकी अनेक जण गैरहजर होते व उपस्थित असणाऱ्यांपैकी इतर सदस्यांनी मौन बाळगले.
फक्त सहा जणांनीच केली चर्चा
By admin | Updated: March 4, 2015 01:23 IST