Join us

अवघी मुंबई महायुतीची

By admin | Updated: May 17, 2014 09:15 IST

नरेंद्र मोदी यांच्या लाटेत मुंबईच्या सहाच्या सहा विद्यमान खासदारांवर पराभव पत्करण्याची नामुष्की आली.

मुंबई : नरेंद्र मोदी यांच्या लाटेत मुंबईच्या सहाच्या सहा विद्यमान खासदारांवर पराभव पत्करण्याची नामुष्की आली. मुंबईतील पाच लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे तर राष्ट्रवादीचे एक असे सर्व खासदार मोदी लाटेत साफ वाहून गेले. परंपरेने काँग्रेसकडे असलेला दक्षिण मुंबई मतदारसंघ शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी जिंकला. मुरली देवरा यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव मिलिंद देवरा येथून दोनदा खासदार झाले होते. मात्र मोदी लाटेत ते हरवून बसले. दक्षिण-मध्य मतदारसंघात शिवसेनेच्या मनोहर जोशींना पराभूत करणार्‍या एकनाथ गायकवाड यांच्यासारख्या अनुभवी काँग्रेस खासदाराला धूळ चारून शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी विजयश्री मिळवला. सुनील दत्त यांच्या पुण्याईने दोन वेळा खासदारकी मिळवलेल्या काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना आपला उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघ राखता आला नाही. तिथे भाजपच्या पूनम महाजन यांनी पहिल्यांदाच खासदारकी मिळवली आहे. उत्तर-पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांनी काँग्रेसचे दिर्घानुभवी खासदार गुरूदास कामत यांना चीत करीत आश्चर्यकारकरित्या विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीचे खासदार संजय दिना पाटील यांचा पराभव करीत उत्तर-पूर्व मुंबईत भाजपचे उमेदवार किरीट सोमैय्या निवडून आले. उत्तर-मुंबई मतदारसंघात बोरिवलीचे आमदार गोपाळ शेट्टी यांनी तब्बल ६ लाख ६४ हजार 00४ इतकी विक्रमी मते मिळवत विद्यमान खासदार संजय निरूपम यांना पराभूत केले आहे. राज ठाकरे यांच्या ‘मनसे’ फॅक्टरकडेही मतदारांनी पूर्णत: दुर्लक्ष करीत महायुतीच्या पारड्यात भरघोस मतदान केले.