Join us

केवळ गरजूंना मदत केली; कोणतेही अयोग्य काम केले नाही - सोनू सूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 05:36 IST

अभिनेता सोनू सूदचा उच्च न्यायालयात अर्ज

मुंबई : कोरोनावरील औषधांची ज्यांना खरोखर आवश्यकता होती, अशा गरजूंनाच मदत केली. ज्या ठिकाणी औषधे उपलब्ध होती मात्र, गरजूंपर्यंत पोहोचत नव्हती, अशा ठिकाणी आपण औषधे पोहोचवण्याचे काम केले, असे बॉलीवूड अभिनेता सोनू सूद याने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे. आपण कोणतेही अयोग्य काम केले नाही, असा दावा सूदने केला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान राज्य सरकारकडे रेमडेसिविर यांसारख्या कोरोनावरील औषधांचा तुटवडा असताना काही राजकीय नेत्यांनी व सेलिब्रिटींनी या औषधांचे वाटप केले. याचा तपास करण्यात यावा, अशी मागणी करणाऱ्या काही याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर आपलेही म्हणणे ऐकण्यात यावे, यासाठी सोनू सूदने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने यासंदर्भात बेकायदेशीर होर्डिंग्ज लावण्यात आले होते का? आणि औषधांचे बेकायदेशीर वाटप करण्यात आले होते की नाही, याचा तपास करण्याचे निर्देश सरकारला दिले होते. मंगळवारच्या सुनावणीत मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने सोनू सूदचा अर्ज दाखल करून घेतला आहे. जनहित याचिकांमध्ये आपल्याला प्रतिवादी करण्यात यावे, अशी विनंती सूदने अर्जाद्वारे केली आहे.