Join us  

पेट्रोल डिझेल विक्रीत अवघी पाच सात टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 5:49 PM

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येण्याची शक्यता

 

मुंबई : मुंबईतील लॉकडाऊनची बंधने हळूहळू शिथिल होऊ लागली असल्याने मुंबईकर काही प्रमाणात घराबाहेर पडू लागले आहेत मात्र अद्यापही कोरोनाची भीती मनात असल्याने घाबरत घाबरत नागरिक घराबाहेर येत असल्याचे चित्र आहे. वाहनांची रस्त्यावर वर्दळ वाढू लागली असली तरी अद्यापही पूर्ण क्षमतेने नागरिक वाहने बाहेर काढत नसल्याने पेट्रोल व डिझेल इंधन विक्रीमध्ये फारसा फरक पडलेला नाही. शुक्रवारी इतर दिवसांतील विक्रीच्या तुलनेत अवघ्या पाचते सात टक्क्यांचीच वाढ झाली. 

गेल्या काही महिन्यातील विक्री व आजच्या विक्रीमध्ये जास्त फरक पडलेला नाही.  लॉकडाऊन कालावधीत आतापर्यंत दररोज होणारी विक्री व आजच्या विक्रीत लक्षणीय वाढ झालेली नाही,  अशी माहिती पेट्रोल डिलर असोसिएशन मुंबई चे अध्यक्ष वेंकट राव यांनी दिली.  मुंबईत पेट्रोल, डिझेल विक्रीमध्ये फारसा फरक पडलेला नसला तरी महामार्गावरील पेट्रोल पंपावरील विक्रीत मात्र चांगली वाढ होत आहे.  मालवाहतूक करणारी वाहने मोठ्या संख्येने वाहतूक करु लागल्याने महामार्गावरील पेट्रोल व विशेषत: डिझेल विक्रीत मोठी वाढ होऊ लागली आहे. 

लॉकडाऊन कालावधीत वेट्रोल व डिझेलच्या विक्रीत तब्बल 85 ते 90 टक्के घट झाल्याने पेट्रोल व डिझेलची विक्री अवघ्या 10 ते 15 टक्क्यांवर येऊन स्थिरावली होती. त्यामुळे आम्हाला व्यवसाय करणे अशक्य झाले आहे, असे मत अध्यक्षांनी व्यक्त केले. विक्रीचे प्रमाण अत्यंत खालावल्याने पेट्रोल पंप धारकांच्या तोट्यात प्रचंड मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत  आम्हाला कर्मचाऱ्यांना वेतन देणे अशक्य झाले आहे. एखादा महिना कामाशिवाय व विक्रीशिवाय वेतन देणे शक्य झाले तरी पुढील वेतन देण्यासाठी आमची प्रचंड दमछाक होत आहे. विक्रीच नसल्याने वेतनासाठीचे पैसे आणायचे कुठून हा यक्षप्रश्न आमच्यासमोर उभा ठाकला असल्याचे राव म्हणाले. आता हळूहळू सर्व व्यवहार सुरु झाल्यानंतर विक्रीमध्ये टप्प्याटप्याने वाढ होईल व परिस्थिती थोडी थोडी सुधारेल असे ते म्हणाले. 

सध्या अत्यंत वाईट परिस्थिती असून मुंबई परिसरातील मेट्रो, बेस्ट,  विमानसेवा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व इतर खासगी वाहतूक सेवा पूर्ण सुरु झाल्यानंतर विक्रीत हळूहळू वाढ होईल असा अंदाज राव यांनी वर्तवला. 

 

टॅग्स :अर्थव्यवस्थापेट्रोल