मुंबई : चर्चगेटला येणाऱ्या लोकलमधील युवतीचा एका तरुणाकडून विनयभंग करण्यात आला आणि यातून पुन्हा एकदा महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. सध्या जीआरपीला (गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस) महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मनुष्यबळ कमी पडत असून आणखी ६00 पोलिसांची गरज असल्याचे पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय (लोहमार्ग) यांनी सांगितले. सध्या लोकलच्या महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी ही फक्त ६00 पोलिसांवरच असल्याचे समोर आले आहे.पश्चिम रेल्वे चर्चगेट ते डहाणूपर्यंत, मध्य रेल्वेची मेन लाइन सीएसटी ते खोपोली आणि हार्बर अंधेरी तसेच पनवेलपर्यंत पसरलेली आहे. यात लोकलच्या महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी जीआरपीवर आहे. सध्या महिला डब्यातील प्रवाशांची सुरक्षा रात्री साडेआठ ते सकाळी साडेसहा वाजेपर्यंत केली जाते. मात्र लाखो महिला प्रवाशांची सुरक्षा करणाऱ्या जीआरपीला गेल्या काही वर्षांपासून मनुष्यबळ कमी पडत आहे. महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची जबाबदारी ही सध्या ६00 रेल्वे पोलीसच पार पाडत आहेत. याबाबत पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय (लोहमार्ग) यांनी सांगितले की, महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न हा गंभीर आहे आणि त्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. आम्ही महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा आढावा आता घेत आहोत. यात आता ६00 रेल्वे पोलीस महिला डब्यातील प्रवाशांची सुरक्षा करत आहेत. आणखी ६00 रेल्वे पोलिसांची गरज असल्याचे आमच्या निदर्शनास आल्याचे पाण्डेय यांनी सांगितले. तसेच महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि संशयित व्यक्तींची तसेच सामानाची तपासणी करण्यासाठी ५00 होमगार्ड आम्हाला काही महिन्यांपूर्वी मंजूरही झाले. मात्र यातील कधी ३00 तर कधी २00 होमगार्डच सुरक्षेसाठी येतात. याबाबतची माहितीही आम्ही होमगार्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे. याबाबत अजून काही प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात आले. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी होमगार्डचे किती मनुष्यबळ लागेल याचीही माहिती घेतली असता साधारण १00 ते १५0 होमगार्ड लागतील, असे निदर्शनास आल्याचे पाण्डेय यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
महिलांच्या सुरक्षेसाठी केवळ ६०० पोलीस
By admin | Updated: August 11, 2015 04:39 IST