Join us  

‘ऑनलाइन’मुळे युवा चळवळींना मिळेल जागतिक आयाम; तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 5:46 AM

प्रत्यक्ष संपर्कापेक्षा डिजिटल संवाद ठरू लागले अधिक प्रभावी

मुंबई : कोरोनाच्या प्रसारापूर्वीच विविध चळवळींनी ‘व्हर्च्युअल’ स्वरूप धारण केले होते. प्रत्यक्ष भेटी, चर्चेपेक्षा मोबाइल आणि सोशल मीडियासारख्या आॅनलाइन माध्यमांद्वारे होणारा संवाद महत्त्वाचा ठरत गेला. काही विषयांत तर तोच प्रभावी ठरला. मोबाइलच्या माध्यमातून तरुणाई जगाकडे पाहत आहे. उपलब्ध माहितीच्या जोरावर परिणामकारक आणि निर्णायक कामाकडे ओढा वाढला आहे. त्यामुळे युवा चळवळीतील संघटनांना परंपरागत कार्यपद्धती सुधारण्याची गरज निर्माण झाल्याची भावना आज, १२ आॅगस्ट आंतरराष्टÑीय युवा दिनानिमित्त युवा चळवळीतील नेते, कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.देशाला चळवळींचा मोठा वारसा आहे. महाराष्ट्रातही विविध आघाड्यांवर चळवळी झाल्या. त्याने जीवनाचे आयाम बदलत गेले. सामाजिक बदल घडले. आज दृश्य स्वरूपात या चळवळी, आंदोलने दिसत नसली तरी चळवळी सुरू आहेत, युवावर्ग स्व-कोशाच्या बाहेर पडत आपले भवताल घडविण्यासाठी झटतो आहे. काल जे रस्त्यावर, खेड्यापाड्यात दिसायचे ते आज सोशल मीडियात दिसत आहेत. याचा अर्थ ते भासमान किंवा आभासी जगात रमले, असा होत नाही. उलट अधिक परिणामकारकपणे, निश्चित उद्दिष्टपूर्तीसाठी काम करत असल्याचा दावा विविध चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला.पाया भक्कम असणाऱ्यांनी पुढे येणे गरजेचेप्रत्यक्ष संपर्कापेक्षा डिजिटल संवाद आता प्रभावी बनला आहे. अगदी राष्ट्रीय विषयांवरही आताशा आंदोलने होत नाहीत. जी होतात त्यामागे विद्यमान संघटना अधिक प्रभावी आहेत. त्याला त्यांचा स्वत:चा चेहरा असतो आणि विशिष्ट धोरणानुसार त्या चालतात. याचा अर्थ युवा चळवळी संपल्या असा होत नाही. चळवळ्या लोकांचे प्रमाण कालही दोन-पाच टक्केच होते, आजही तेवढेच आहे. उलट सोशल मीडियामुळे समविचारी गोतावळा आता सहज मिळतो. बदलत्या काळात या चळवळी टिकवायच्या असतील तर पाया भक्कम असणाऱ्यांना आता संघटकाच्या, योजकाच्या भूमिकेत जावे लागेल.- डॉ. आर. मोरेश्वर, आदिवासी भागातील आरोग्य चळवळीचे कार्यकर्तेतंत्रज्ञानामुळे माहितीचा प्रवाह आवाक्यातशिक्षण आणि आजूबाजूच्या वातावरणामुळे तरुण वर्ग ‘गोल ओरिएंटेड’ झाला आहे. सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानामुळे नावीन्याचा, माहितीचा प्रवाह आता आवाक्यात आला आहे. कनेक्टिव्हीटीच्या जोरावर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष निवडून आला. तोच प्रकार भारतात झाला. जर राजकीय क्षेत्राचे आयाम अशा प्रकारे बदलत असतील तर जीवनाशी निगडित अन्य क्षेत्रे आणि त्यातील चळवळींचे स्वरूपही या अनुषंगाने बदलले तर त्यात फारसे वावगे नाही. केवळ, त्याला मूलभूत चिंतन, अभ्यासाची जोड मिळायला हवी. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील मूलभूत आणि वैज्ञानिक अभ्यासाची रचना मात्र आपल्याला आवर्जून उभी करावी लागेल.- डॉ. रेवत कानिंदे, जे. जे. रूग्णालय