Join us  

पीएमसीच्या खातेधारकांचे आॅनलाइन सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 6:15 AM

पीएमसी बँकेवर आरबीआयने लादलेल्या निर्बंधामुळे खातेदारांना कोणत्या प्रकारच्या अडचणी येणार आहेत, हे समजून घेण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीकडून खातेधारकांचे गुरुवारपासून आॅनलाइन सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

मुंबई : पीएमसी बँकेवर आरबीआयने लादलेल्या निर्बंधामुळे खातेदारांना कोणत्या प्रकारच्या अडचणी येणार आहेत, हे समजून घेण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीकडून खातेधारकांचे गुरुवारपासून आॅनलाइन सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ते आठ दिवस सुरू राहील.मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. शिरीष देशपांडे यांनी सांगितले की, पंजाब आणि महाराष्टÑ सहकारी (पीएमसी) बँकेत खातेधारकांचे किती पैसे अडकले आहेत, याची साधारण माहिती घेण्यासाठी हे सर्वेक्षण केले जाईल. बँकेतील पैसे हे खातेधारकांच्या हक्काचे आहेत. बँकेत एखाद्याने केलेल्या चुकीची शिक्षा थेट खातेधारकांना का देत आहात, असा प्रश्न देशपांडे यांनी याबाबत उपस्थित केला.अशा प्रकारचा गोंधळ होणार नाही यासाठी वेगळे मार्ग अवलंबले पाहिजेत. खातेदारांना वेठीस धरू नये, याप्रकरणी लवकरात लवकरण मार्ग काढणे गरजेचे आहे. खातेदारांना कुठलाही त्रास न होता किंवा त्यांची कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण न होता त्यांना त्यांचे पैसे काहीही करून मिळायला हवेत, असेही ते म्हणाले.पीएमसी बँकेने घेतलेला निर्णय हा अत्यंत घाईगडबडीचा होता. खातेधारकांमुळे बँका चालत आहेत, हे सरकारने लक्षात घेतले पाहिजे. देश तंत्रज्ञानामार्फत आॅनलाइन व्यवहार करत असताना बँकांवर पूर्वीचा ‘भारतीय रिझर्व्ह बँकेचा रेग्युलेशन अ‍ॅक्ट ३५ ए’ हे जुनाट कलम लावले जात आहे. जुन्या कलमाचा उपयोग करून निर्माण झालेली ही समस्या सुटणार नाहीत. सर्वेक्षणामार्फत माहिती गोळा करून खातेधारकांना लवकरात लवकर पैसे कसे मिळवून देता येतील, यासाठी मुंबई ग्राहक पंचायत काम करत आहे, असेही देशपांडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :पीएमसी बँक