Join us  

१०० टक्के प्रवेशासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाचे ऑनलाइन समुपदेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 2:29 AM

पालक, विद्यार्थ्यांचा सहभाग : पदविका प्रवेशासाठी डीटीई पोर्टलवर नोंदणीचे आवाहन

मुंबई : दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम प्रवेशाचा कोटा यंदा १०० टक्के पूर्ण करण्यासाठी तंत्रशिक्षण विभागाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच भाग म्हणून डिप्लोमा अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी पदविका समुपदेशन हा आॅनलाइन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला विद्यार्थी-पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला. राज्यातील १९ हजार ६८१ विद्यार्थी व पालकांनी त्यात आपला सहभाग दर्शविला.

बुधवारी हा कार्यक्रम पार पडला असून राज्यातील सर्व शासकीय व खासगी पॉलिटेक्निकमध्ये या कार्यक्रमाचे थेट प्रसारण झाले. कार्यक्रमामध्ये तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ व डॉ. विनोद मोहितकर यांनी विद्यार्थी व पालकांना पदविका अभ्यासक्रमाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. राज्यातील सर्व अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम राबविणाºया तंत्रनिकेतनांमध्ये लाइव्ह बॉडकास्टद्वारे आणि इंटरनेटच्या माध्यमातून वेबलिंक आणि फेसबुक लाइव्हद्वारे आपला सहभाग दर्शविला. या कार्यक्रमाला मुंबई विभागातील ४४ संस्थांतील २४६२, पुणे विभागातील ९२ संस्थांमधून ५१७३, नाशिक विभागातील ९८ संस्थांमधून ४३६१, औरंगाबाद विभागातील २९०५, अमरावतीमधील २११८ अशा १९ हजार ६८१ विद्यार्थी व पालकांनी यामध्ये भाग घेतला होता. त्याचबरोबर डीजीआयपीआर, एमएसईबीटी आदी फेसबुक पेजवरही सुमारे ७ हजारहून अधिक जणांनी सहभागी होत याला प्रतिसाद दिला.देशात जीडीपी वाढविण्यासाठी औद्योगिक क्रांतीची आवश्यकता व त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ पदविका अभ्यासक्रमामार्फत उपलब्ध करून देशाच्या तसेच राज्याच्या विकासासाठी हातभार लावण्याची गरज असल्याचे मत डॉ. अभय वाघ यांनी व्यक्त केले. त्यामुळे दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पदविका प्रवेशासाठी डीटीई पोर्टलवर नोंदणी करावी आणि प्रवेश घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले. तर संचालक मोहितकर यांनी तंत्रशिक्षण मंडळामार्फत रोजगार क्षमता वाढविण्यासाठी केले जाणारे प्रयत्न तसेच पदविका अभ्यासक्रमाचे महत्त्व त्याची उपयोगिता यांची माहिती दिली. या कार्यक्रमात अभियांत्रिकी क्षेत्रातील चेतन रायकर, आर. ए. पांचाळ, गिरीश दंडीगे, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील डॉ. नरेशकुमार हराळे, राजेश लिमये, विनायक ठकार आदींनी विद्यार्थी व पालकांशी थेट संवाद साधत त्यांच्याकडून आलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. 

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रदहावीचा निकाल