पनवेल : दिवाळीत बहुतांश सरकारी कार्यालयांना सुटी असते. खासगी कार्यालये मात्र सुरू असल्याने येथील कर्मचा-यांना दिवाळीच्या खरेदीसाठी वेळच मिळत नाही. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्यांंकडून आॅनलाइन शॉपिंगला पसंती दर्शवण्यात येत आहे. उत्सवात बाजारात प्रचंड गर्दी असते. शॉपिंगसाठी निघाल्यावर वाहतूक कोंडी, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जीव नकोसा होतो. मॉल्स, मोठमोठ्यात शो रुम्समध्येही हीच अवस्था असते. वस्तू खरेदी केल्यावर बिल पे करण्यासाठी तासन्तास रांगेत उभे रहावे लागते. त्यापेक्षा हवी ती वस्तू सवलतीच्या दरात घरबसल्या मिळत असल्याने आॅनलाइन शॉपिंगची क्रेझ वाढत आहे. हल्ली मोबाइल, इंटरनेट, लॅपटॉप, कॉम्प्युटर या वस्तू गरजेच्या झाल्याने प्रत्येकाकडे आढळतात. केवळ एका कॉलवर हवी ती वस्तू घरबसल्या मिळवता येते. अगदी डिनरसेटपासून चादरी, बेडशीट्स, दागिने, मोबाइल, लॅपटॉपपर्यंतच्या वस्तूंचा यात समावेश आहे. आॅनलाइन शॉपिंगसाठी अनेक वेबसाईट्स उपलब्ध असून सण-उत्सवात खास सवलती दिल्या जातात. काही बँ्रडेड कंपन्यांनीही आॅनलाइन शॉपिंग सुविधा उपलब्ध करून केले आहे. महानगरांबरोबरच लहान शहरांमध्येही आॅनलाइन शॉपिंगचे प्रमाण वाढत आहे. गेल्या दहा वर्षांत नागरिकांचा तंत्रवापराबरोबरच आर्थिक स्तरही उंचावला असल्याने, आॅनलाइन शॉपिंगचे प्रमाण वाढल्याचे असोकेमच्या सर्वेक्षणावरून स्पष्ट होत आहे. ही शॉपिंग करण्यात महिलावर्ग आघाडीवर आहे. बाजारात जाऊन खरेदी केल्यास वेळ लागतो. त्यापेक्षा आॅनलाइन बुक केल्यास घरबसल्या पाहिजे ती वस्तू खरेदी करता येत असल्याचे पनवेल येथील रेणू सावंत यांनी सांगितले.
आॅनलाइन शॉपिंगलाही पसंती
By admin | Updated: October 22, 2014 22:30 IST