खर्डी : महसूल खात्याने सातबारा आॅनलाइन केल्याने गावपाड्यांवरील आदिवासी शेतकऱ्यांना सातबारा मिळवणे कठीण झाले आहे. या उताऱ्यासाठी प्रत्येकी १७ रुपये खर्च येणार असून तो या परिसरातील वेळूक, वाशाळा, पाटोळ, धाकणे, कसारा, विहिगाव, माळ, शिरोळ, अजनूप, टेंभा, अंबिवली, दळखण, जरंडी, धामणी, चांदे, रातांधळे अशा कसारा आणि खर्डी परिसरातील राहणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना तो मिळविण्याकरिता १०० रुपये खर्चून येथील तलाठी कार्यालयात जावे लागते़ येथे आल्यानंतर सातबारा देण्याकरिता कार्यालयात संगणक कार्यप्रणाली उपलब्ध नसल्याने तो सायबर अथवा सेतूमधून घ्या, असे उत्तर मिळत असल्याने गरीब,आदिवासी शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. आॅनलाइन केवळ सातबाराचा उतारा मिळतो़ मात्र, फेरफार किंवा जुने सातबारा उतारे मिळविण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये अर्ज करावा लागतो़ त्यासाठी प्रत्येकी ३५ रु पये खर्च, जाणे-येणे, नाश्त्यासाठी वेगळा खर्च करावा लागतो. वेळही जास्त लागतो. त्यामुळे सातबारा मिळविणे गरीब, आदिवासी शेतकऱ्यांना परवडणारे नसल्याने त्यांना तलाठी कार्यालयामार्फत विनामूल्य सातबारा उतारा मिळावा, अशी मागणी गरीब शेतकरी करीत आहेत. (वार्ताहर)संगणकावर सातबारा अपडेटचे काम पूर्ण होण्यास विलंब झाला आहे. मात्र, आठ दिवसांत तलाठी कार्यालयातून शेतकऱ्यांना सातबारा उतारे वितरीत केले जातील. - पी.पी. पाटील,खर्डी मंडल अधिकारी
आॅनलाइन सातबारा शेतकऱ्यांना परवडेना
By admin | Updated: February 3, 2015 23:20 IST