मुंबई : शिकाऊ परवान्यासाठी आॅनलाइन नोंदणी करण्याची सुविधा अंधेरी आरटीओकडून करण्यात आल्यानंतर वडाळा आरटीओनेही ही सेवा सुरू करावी, अशी मागणी केली जात होती. मात्र, तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. अखेर, त्याला मुहूर्त मिळाला असून ४ आॅगस्टपासून वडाळा आरटीओकडून ही सेवा दिली जात आहे. वडाळा आरटीओचा पसारा सायन ते मुलुंड आणि मानखुर्द असा असून शिकाऊ परवाना मिळवताना करण्यात येणाऱ्या नोंदणीसाठी अर्ज घ्यावा लागत असे. हा अर्ज आरटीओकडे जमा करतानाही बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे अनेक जण दलालांची मदत घेत होते. मात्र, दलालांकडून होणारी लूटमार पाहता शिकाऊ परवान्याच्या नोंदणीसाठी अंधेरी आरटीओने सुरू केलेल्या आॅनलाइन सुविधेप्रमाणे वडाळा आरटीओनेही ही सुविधा पूर्व उपनगरवासीयांना देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. अखेर, ४ आॅगस्टपासून वडाळा आरटीओकडून आॅनलाइन सुविधा देण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे कुठूनही आणि कधीही शिकाऊ परवाना मिळवण्यासाठी आॅनलाइन अर्ज केला जाऊ शकणार आहे. वडाळा आरटीओने सांगितलेल्या माहितीनुसार ही सुविधा स्टॉल प्रणालीशी संलग्न असेल. दर दिवशी २०० उमेदवारांना या सुविधेचा लाभ घेता येईल आणि आपणास हवी असलेली तारीख, वेळ यांची निवड करता येईल. ही सुविधा केंद्र सरकारच्या ६६६.५ंँंल्ल.ल्ल्रू.्रल्ल या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
आॅनलाइनद्वारे करा शिकाऊ परवान्याची नोंदणी
By admin | Updated: August 2, 2014 02:33 IST