Join us

ऑनलाईन मोलकरणीने घातला गंडा

By admin | Updated: May 11, 2014 22:45 IST

दिल्लीच्या मैड ब्युरोमध्ये ३६ हजार मोजून घरकामासाठी ठाण्याच्या उच्चभ्रू कुटुंबाने आणलेली एक मोलकरीण अवघ्या तीन तासात गायब झाली.

ठाणे: दिल्लीच्या मैड ब्युरोमध्ये ३६ हजार मोजून घरकामासाठी ठाण्याच्या उच्चभ्रू कुटुंबाने आणलेली एक मोलकरीण अवघ्या तीन तासात गायब झाली. विशेष म्हणजे या प्रकारानंतर ज्या मैड ब्युरोमधून तीला पाठविण्यात आले, त्या ब्यूरोचा फोनही नॉट रिचेबल झाला आहे. अखेर या कुटुंबाने वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बहुतेक बाबी ऑनलाईन मार्केटींग करण्याच्या अट्टाहासामुळे या कुटुंबाला विकतचा ताप सहन करावा लागला आहे. वर्तकनगर पोलिस आता गुन्हे अन्वेषण विभागातील सायबर सेलच्या मदतीने या बोगस ब्युरोचा शोध घेत आहेत.हिरानंदानी मेडोज परिसरातील इडनवूड मेपल हाउसमधील विक्र म खुराणा यांच्या पत्नी मानसी या दिल्लीच्या आहेत. त्यामुळे त्यांनी नवी दिल्लीच्या बदरपूर येथील शोभिता मैड ब्युरो या नोंदणीकृत संस्थेच्या अनिल मुखिया यांना फोन करून घरकामासाठी मोलकरीण पाहिजे असल्याचे सांगितले. त्यानुसार,९ मे रोजी ललित मुखिया याच्यासोबत आलेल्या मंजू झा (२०) या मोलकरणीला मुंबई सेन्ट्रल येथून सकाळी पावणेदहा वाजता त्यांनी ताब्यात घेतले. त्यामोबदल्यात त्यांनी ३६ हजार रु पये दिले. त्यानंतर ठाण्यातील घरी आल्यावर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मंजू अचानक गायब झाली. अवघ्या तीन तासात मोलकरीण पसार झाल्याने खुराणा दाम्पत्याने ब्युरोशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोनच बंद आढळल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा, खुराणा यांनी वर्तकनगर पोलिसात फरार मंजूसह दोघाही मुखीयांविरोधात तक्रार दाखल केली आहे.