Join us
Daily Top 2Weekly Top 5

एक वर्ष मेट्रोचा वेग ताशी ५0 किमी?

By admin | Updated: May 22, 2014 03:10 IST

मेट्रो सुरू झाल्यास ती सुरुवातीला ताशी ५0 किलोमीटर वेगाने धावण्याची मंजुरी आरडीएसओकडून देण्यात आली आहे

मुंबई : मेट्रो सुरू झाल्यास ती सुरुवातीला ताशी ५0 किलोमीटर वेगाने धावण्याची मंजुरी आरडीएसओकडून (रिसर्च डिझाइन अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड आॅर्गनायझेशन) देण्यात आली आहे. मात्र या मेट्रोचा वेग वाढवण्याचीही मंजुरी असली तरी काही तांत्रिक कारणांमुळे निदान एक वर्ष तरी मेट्रोचा वेग ताशी ५0 किलोमीटर एवढाच राहील, असे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. ४ हजार ३२१ कोटी रुपयांचा आणि ११.४0 किलोमीटर लांबीचा वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वे लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. आरडीएसओकडून वेगाची चाचणी आणि पश्चिम रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून मेट्रो रेल्वे तसेच स्थानकांची पाहणी करण्यात आल्यानंतर आता मेट्रोच्या डब्यांची परवानगी रेल्वे बोर्डाकडून येणे बाकी आहे. त्याचा प्रस्ताव रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून २२ एप्रिल रोजी लखनौच्या मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे गेला असून, त्यानंतर रेल्वे बोर्डाकडे जाणार आहे. तत्पूर्वी आरडीएसओकडून मेट्रोच्या वेगाची चाचणी घेण्यात आल्यानंतर ती ताशी ५0च्या वेगानेच धावण्याची परवानगी देण्यात आली आहे. मेट्रोची चाचणी ही आरडीएसओकडून ताशी ९0 किलोमीटर वेगाने घेण्यात आली आणि मात्र त्याला अखेरची वेगाची परवानगी ही ताशी ८0 किलोमीटरची देण्यात आली आहे. मात्र मेट्रो ही काही तांत्रिक कारणांमुळे सुरुवातीला काही दिवस ताशी ५0 किलोमीटर वेगाने धावेल, असे सांगण्यात येत होते. पण आता हा वेग निदान एक वर्ष तरी राहू शकतो, असे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. मेट्रोच्या रुळावर पडणारा ताण किती येत आहे, हे बघण्यासाठी एक यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्याची माहिती मिळण्यास थोडा उशिर लागणार आहे.