Join us

एक रुपयाची भाडेवाढ नको

By admin | Updated: May 28, 2015 01:18 IST

आम्हाला एक रुपया भाडेवाढीची भीक नको. मीटरमध्ये बदल करण्यासाठी येणारा खर्च जास्त असणार असून तो खर्च कमी करा. अन्यथा भाडेवाढ नको,

मुंबई : आम्हाला एक रुपया भाडेवाढीची भीक नको. मीटरमध्ये बदल करण्यासाठी येणारा खर्च जास्त असणार असून तो खर्च कमी करा. अन्यथा भाडेवाढ नको, अशी अजब मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनकडून करण्यात आली आहे. याबाबतचे एक लेखी पत्र अप्पर परिवहन सचिवांना देण्यात येणार असल्याचे युनियनकडून सांगण्यात आले. १ जूनपासून रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात एक रुपया वाढ करण्याचा निर्णय एमएमआरटीएने घेतला. या भाडेवाढीमुळे रिक्षाचे भाडे १७ रुपयांवरून १८ तर टॅक्सीचे भाडे २१ रुपयांवरून २२ रुपये होणार आहे. या भाडेवाढीची माहिती उच्च न्यायालयात सादर करून त्याची मंजुरी घ्यावी लागणार आहे. सध्या मात्र न्यायालयीन सुट्या सुरू असून ८ जूननंतरच भाडेवाढीवर न्यायालयाकडून निर्णय होणार आहे. याबाबत युनियनचे सरचिटणीस ए.एल. क्वाड्रोस यांनी सांगितले की, आम्हाला एक रुपया भाडेवाढीची भीक नको. नवीन भाडेवाढीमुळे मीटरमध्ये बदल करण्यासाठी (रिकॅलिब्रेशन) खर्च जास्त येणार असून तो चालकांना परवडण्यासारखा नाही. हा खर्च कमी करून चालकाला २00 ते ३00 रुपये एवढा खर्च येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तशी मागणी अप्पर परिवहन सचिव गौतम चॅटर्जी यांच्याकडे करण्यात येणार आहे.