Join us  

पीडिताच्या नातेवाइकांना दहा लाख नुकसानभरपाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 6:13 AM

एका रुग्णाच्या नातेवाइकाच्या कुटुंबीयांना अंतरिम नुकसान भरपाई म्हणून दहा लाख रुपये देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला मंगळवारी दिला.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातील एमआरआय मशिन दुर्घटनेत गेल्या वर्षी मृत्यू झालेल्या एका रुग्णाच्या नातेवाइकाच्या कुटुंबीयांना अंतरिम नुकसान भरपाई म्हणून दहा लाख रुपये देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला मंगळवारी दिला. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा नातेवाईक राजेश मारू याचा मृत्यू झाला, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले.रुग्णालयाने निष्काळजीपणा केला नसता, तर ही दुर्दैवी घटना घडली नसती, असा निष्कर्ष काढण्याइतपत पुरावे सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रशासन मृत व्यक्तीच्या कुुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याच्या जबाबदारीपासून हात झटकू शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. मारू यांच्या कुुटुंबीयांनी नुकसान भरपाईसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण न झाल्याने, महापालिकेने मारू कुटुंबीयांना अंतरिम नुकसान भरपाईची रक्कम म्हणून दहा लाख रुपये द्यावेत. त्यापैकी पाच लाख रुपये पाच वर्षांसाठी मुदत ठेवीवर ठेवावेत, असा आदेश न्यायालयाने महापालिकेला दिला.याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, २८ जानेवारी, २०१८ रोजी राजेश मारू त्यांच्या आजारी नातेवाइकाला भेटायला नायर रुग्णालयात गेला. त्या दिवशी संध्याकाळी त्याच्या नातेवाइकाला रुग्णालयात असलेल्या एमआरआय स्कॅन सेंटरमध्ये स्कॅनिंगसाठी नेण्यात आले. मारू याच्याबरोबर त्याचे नातेवाईक, वॉर्डबॉय आणि एक महिला अटेंडंट एमआरआय स्कॅनच्या लॉबीपर्यंत होते. नियमानुसार, मारू व त्यांच्या नातेवाइकांना त्यांच्याजवळ असलेल्या धातूच्या वस्तू दूर ठेवण्यास सांगण्यात आले. मात्र, एका वॉर्डबॉयने राजेश मारूला आॅक्सिजनचे सिलिंडर एमआरआय मशिन बंद आहे, असा समज करून आत नेण्यास परवानगी दिली. आता जाताच एमआरआयमशीच्या मॅग्नेटिक व्हेवने मारूला खेचून घेतले आणि या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे, पण वॉर्डबॉयने मारू याला मशिन बंद असल्याची माहिती दिली की नाही, याबाबत रुग्णालय प्रशासन काही ठोसपणे सांगू शकले नाही.।भरपाई देण्यास सहा आठवड्यांची मुदत!‘एफआयआर, साक्षीदारांचे जबाब, रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे यावरून याचिकेत उपस्थित केलेले मूळ मुद्दा निर्विवादपणे मान्य करण्यात आला आहे की, मारू एमआरआय रूममध्ये परवानगी न घेता गेला नाही, तसेच तेथील वॉर्डबॉयनेच त्याच्या हातात आॅक्सिजनचा सिलिंडर दिला. यावरून ही केस रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे असे प्रसंग पुन्हा घडू नयेत, यासाठी महापालिकेला नुकसान भरपाई द्यावीच लागेल,’ असे म्हणत न्यायालयाने महापालिकेला सहा आठवड्यांत नुकसान भरपाईची रक्कम देण्याचा आदेश दिला.