मुंबई : सणासुदीच्या काळात गावी जाणा-या प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. याचा फायदा घेत, तिकिटांचा काळाबाजार करणा-या जोडीला अटकाव घालण्यात मध्य रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. मध्य रेल्वे विशेष पथकाने चेंबूर येथे छापा टाकत दोघा जणांना अटक केली आहे. संदीप शर्मा आणि शिवकुमार गुप्ता अशी त्यांची नावे आहे. कारवाईत पथकाने १ लाख १५ हजार रुपयांची ई-तिकिटे जप्त केली आहेत.दिवाळीतील गावी जाणाºया प्रवाशांची संख्या मोठी असते. याचा गैरफायदा घेत, प्रवाशांकडून जास्त पैसे उकळून तिकिटे देत असल्याची माहिती रेल्वेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार, रेल्वे प्रशासनाने रेल्वे सुरक्षा बल, वाणिज्य विभाग आणि दक्षता विभाग यांचे संयुक्त पथक स्थापन केले. मिळालेल्या माहितीनुसार संयुक्त पथकाने चेंबूर येथील अमर महालजवळील रमेश इलेक्ट्रिकल दुकानात छापा टाकला. दुकानाची तपासणी केली असता, सॉफ्टवेअरच्या माध्यमाने तिकीट आरक्षित करत असल्याची माहिती समोर आली. दुकानातील संदीप शर्मा आणि शिवकुमार गुप्ता यांनी जादा दराने तिकिटांची विक्री करत असल्याची कबुली दिली.निओ या सॉफ्टवेअरच्या माध्यमाने हे आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून बेकायदेशीरपणे तिकीट आरक्षित करत होते. यासाठी ४१ वैयक्तिक आयडींचा वापर ही दुकली करत होती. या जोडीकडून एक लाख १५ हजार ४२५ रुपये किमतींची ४२ ई-तिकिटे जप्त करण्यात आली. याबाबत कुर्ला आरपीएफ पुढील तपास करत आहे.
एक लाख किमतीची ई-तिकिटे जप्त, मध्य रेल्वे पथकाची विशेष कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 06:57 IST