Join us  

एक लाख ५१ हजार सूर्यनमस्कार योगाप्रेमींनी केले समर्पित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 1:16 AM

लोकमत माध्यम प्रयोजक : वर्सोव्यात योगाथॉन सिझन-२१,५०० योगाप्रेमींची उपस्थिती

मुंबई : मॉडेल टाउन रेसिडेन्ट्स वेल्फेअर असोसिएशन व योगा विथ चेतना यांच्या संयुक्त विद्यमाने, रविवारी सकाळी ६.३० ते ८.३० वाजेपर्यंत वर्सोव्यात योगाथॉन सिझन-२ चे आयोजन करण्यात आले होते. वर्सोवा मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या चाचा नेहरू उद्यानात झालेल्या या कार्यक्रमात १,५०० योगाप्रेमी उपस्थित होते. मुंबई, पालघर, नेरुळ येथून महिलांचा मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमात सहभाग होता. विशेष म्हणजे, या योगाथॉन कार्यक्रमात एका ५ वर्षीय अंध मुलीने, तसेच ५ वर्षांच्या मुलाने व ८८ वर्षांच्या महिलेने सहभाग घेतला होता. या योगाथॉन कार्यक्रमाचे महत्त्व म्हणजे येणाऱ्या मकर संक्रांतीचे औचित्य साधून सूर्यदेवाला १ लाख ५१ हजार सूर्यनमस्कार योगाप्रेमींनी समर्पित केले.

मुंबई महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र (बाळा) आंबेरकर व विनय गंडेचा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. योगागुरू चेतना गंडेचा यांनी यशस्वीपणे कार्यक्रम पार पाडला. त्यांनी यापूर्वी १ हजार ८ सूर्यनमस्कार घातले असून, याची लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. योगा विथ चेतनाच्या चेतना गंडेचा या प्रसिद्ध योगागुरू आहेत. या अगोदर योगाथॉन सिझन-२ मध्ये ८०० योगा प्रेमी सहभागी झाल्याची बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. या कार्यक्रमाची लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली असल्याची माहिती आयोजक देवेंद्र (बाळा) आंबेरकर यांनी दिली. ‘लोकमत’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे. या कार्यक्रमाला उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर, माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह, कोकण विभागाचे प्रमुख अभियंता एस.आर.त्रिमनवार, किशोर गंडेचा, दीपक अग्रवाल, उपविभागप्रमुख राजेश शेट्ये उपस्थित होते.

खासदार गजानन कीर्तिकर यांनी आपल्या भाषणात योगामुळे होणारे फायदे व शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. योगाचे महत्त्व लोकांमध्ये पोहोचविल्याबद्दल त्यांनी योगागुरू चेतना यांच्या कार्याचा गौरव केला. कृपाशंकर सिंह यांनी असोसिएशन व अध्यक्ष राजेश ढेरे, संजीव कल्ले, अशोक मोरे, अनिल राऊत यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयवंत राऊत, विकी गुप्ता, सुरेश बंगेरा, दिनेश गवलानी, प्रतीक सुर्वे, अंकुश पाटील, विमल यादव, कृष्णा निर्गुण, नसीर अन्सारी, सुरेश पाटील, रोहन पिंगे, शोकत विरानी, जितू पांडे, सूर्यकांत आंबेरकर, प्रदीप मेहरोत्रा, पूनम छवलानी, हिमांशू गंडेचा, नकुल शाह, सागर मेहरोत्रा, दिनेश राजपूत यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :योग