Join us  

कोरोनामुळे चेंबूरमध्ये एकाचा मृत्यू, मुंबईत बाधितांची संख्या १,२००हून अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2023 11:56 AM

राज्यात दिवसभरात ५६९ रुग्ण, मुंबईत २२१ नवे रूग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : चेंबूर येथील ६९ वर्षीय नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत बुधवारी २२१ कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यापैकी २०४ बाधितांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात झपाट्याने वाढत असून सक्रिय रुग्णसंख्या १२००हून अधिक झाली आहे.

चेंबूर येथील रुग्णाला मंगळवारी रुग्णालायत दाखल करण्यात आले  होते. या रुग्णाच्या लसीकरणाविषयी माहिती पालिकेकडे उपलब्ध नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. या रुग्णाला उच्च रक्तदाब आणि हायपोथायराॅडिसमचाही आजार होता. दिवसभरात १७ रुग्णांना रुग्णालयात दाखल केले असून, दोन रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.

शहर उपनगरात उपलब्ध ४ हजार ३५४ खाटांपैकी ८० खाटांवर रुग्ण दाखल आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८.२ टक्के आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा काळ  ५ हजार २१ दिवसांवर येऊन ठेपला आहे. मागील चोवीस तासांत पालिकेने रुग्णांच्या संपर्कातील अतिजोखमीच्या १२२ रुग्णांचा शोध घेतला आहे.

दिवसभरात ५६९ रुग्ण

सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात बुधवारी ५६९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, २ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यातील एक मृत्यू मुंबईतील तर दुसरा मृत्यू पिंपरी चिंचवड येथील आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.८२ टक्के एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ८,६६,६४,३८७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ०९.४० टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ३ हजार ८७४ रुग्ण सक्रिय आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याचेंबूर