Join us  

कॅन्सरग्रस्त बालक बनला एका दिवसाचा पोलीस अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 3:52 AM

कॅन्सरग्रस्त सात वर्षीय मुलाचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलुंड पोलिसांनी घेतलेल्या पुढाकारातून माणुसकीचे अनोखे दर्शन घडविले आहे. मुलुंड पोलिसांनी चिमुरड्याला खाकी वर्दी देत त्याला एक दिवसाचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बनविले.

मुंबई : कॅन्सरग्रस्त सात वर्षीय मुलाचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलुंड पोलिसांनी घेतलेल्या पुढाकारातून माणुसकीचे अनोखे दर्शन घडविले आहे. मुलुंड पोलिसांनी चिमुरड्याला खाकी वर्दी देत त्याला एक दिवसाचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बनविले.आशिष अर्पित मंडल असे त्या कॅन्सरग्रस्त बालकाचे नाव आहे. त्याला पोलीस निरीक्षक व्हायचे आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून तो कॅन्सरशी लढा देत आहे. काही सामाजिक संस्थांनी याबाबत मुलुंड पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांनी त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्याला त्यांच्या खुर्चीत बसविले. मंडल याला खाकी वर्दी देत मुलुंड पोलीस ठाण्याचा एक दिवसाचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बनविले. त्याला कामकाजाची माहिती दिली. या वेळी मंडलच्या चेहऱ्यावरील आनंद वेगळाच होता. मुलुंड पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :मुंबईपोलिस