Join us  

अवघ्या २४ तासांत वाचले एक कोटी; १९३० वर कॉल अन् पैसे खात्यात रिटर्न

By मनीषा म्हात्रे | Published: April 26, 2024 10:51 PM

नागरिकांनी कुठल्याही अमिषाला बळी पडू नका असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाईनमुळे गेल्या २४ तासात शेअर ट्रेडिंग गुंतवणूक आणि कुरिअर स्कॅममध्ये फसवणूक झालेल्या रक्कमेपैकी १ कोटी वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच, नागरिकांनी कुठल्याही अमिषाला बळी पडू नका असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी १९३०  सायबर हेल्पलाईनवर आलेल्या विविध तक्रारीमध्ये शेअर ट्रेडींग फ्रॉड व कुरियर स्कॅममध्ये नागरिकांची फसवणूक झालेल्या रकमेपैकी १ कोटी २ लाख ६६ हजार रुपये गेल्या २४ तासांत वाचविण्यात पथकाला यश आले आहे. फसवणूक झालेली रक्कम गोठवून खातेधारकांना परत मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कांदिवली व वांद्रे मुंबई येथे राहणारे तक्रारदार यांची शेअर ट्रेडींगमध्ये भरघोस नफा मिळण्याचे अमिष दाखवून त्यांना १ कोटी ८० लाख व २ कोटी २९ लाख रूपयांची फसवणूक झाली. तसेच बोरीवली येथे राहणा-या तक्रारदार यांची कुरिअर स्कॅम प्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी १९३० सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधत तक्रार दिली. 

त्यानुसार, पथकाने तत्काळ एनसीआरपी पोर्टलवर तक्रार दाखल करून संबधित बँकेच्या नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्याचे वपोनि दत्ताराम चव्हाण यांच्या नेतृत्वात पोउनि मंगेश भोर, पोउनि बावस्कर यांच्या १९३० हेल्पलाईन पथकाने तातडीने पावले उचलत सायबर ठगांनी वळती केलेल्या रक्कमेपैकी १ कोटी २ लाख  रुपये संबंधित बँक खात्यावर गोठविण्यास यश आले आहे. 

टॅग्स :सायबर क्राइमगुन्हेगारी