मुंबई : अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी चारकोप पोलिसांनी एका 24 वर्षाच्या तरुणाला अटक केली. संजीव ऊर्फ संजय शर्मा असे आरोपीचे नाव असून, तो मूळचा उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वीच तो मुंबईत आला होता. आरोपी पीडित मुलीला तो लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करीत होता. मुलगी गरोदर राहिल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
चारकोपच्या श्रवणनगर परिसरात आरोपी हा एका मिठाई बनविण्याच्या बॉक्सच्या गोदामामध्ये कामाला होता. पीडित मुलगी त्याच परिसरात राहणारी असून, ती आठवीतील विद्यार्थिनी आहे. मागील काही दिवसांपासून मुलीच्या वागण्यावर घरच्यांना संशय होता. दरम्यान, मुलगी आजारी पडली असता तिला नातेवाइकांनी रुग्णालयात दाखल केले. तेव्हा ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी घरच्यांनी संजीव शर्माविरोधात चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. चारकोप पोलिसांनी त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले. (प्रतिनिधी)