नवी मुंबई : बनावट नोटांच्या विक्रीसाठी आलेल्या एकाला खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी संध्याकाळी अटक केली. त्याच्याकडून २ लाख २४ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. तुर्भे रेल्वे स्थानक येथे ही कारवाई करण्यात आली आहे.तुर्भे रेल्वे स्थानक परिसरात एक व्यक्ती बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. यावेळी तुर्भे रेल्वे स्थानकात एक संशयित तरुण पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे २ लाख २४ हजार रुपये किमतीच्या नोटा आढळून आल्या. भारतीय चलनाच्या एक हजार रुपयांच्या या नोटा होत्या. या नोटांची खात्री पटवली असता त्या बनावट असल्याचे स्पष्ट झाल्याचे खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजन जगताप यांनी सांगितले. त्यानुसार या तरुणाला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद लालमोहम्मद शेख (२३) असे या तरुणाचे नाव आहे. तो अंधेरी रेल्वेस्थानकालगत झोपडपट्टीतला राहणारा असून मूळचा पश्चिम बंगालचा आहे. (प्रतिनिधी)
बनावट नोटांप्रकरणी एकाला अटक
By admin | Updated: December 8, 2014 03:36 IST