मुंबई : आकर्षक जाहिरातीच्या माध्यमातून विकण्यात येत असलेल्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या औषधीसाठ्यांवर कारवाई करत अन्न व औषध प्रशासनाने सुमारे १ कोटी ५२ लाख रुपयांची २६३ प्रकारची विविध औषधे जप्त केली आहेत. मानसिक आजार, मधुमेह, लठ्ठपणा, लैंगिक कार्यक्षमता, उंची वाढविणे, स्त्रियांचे आजार, कॅन्सर आणि संधिवात बरा करण्याचा दावा करणाऱ्या औषधांच्या जाहिराती करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिले होते. अन्न व औषध प्रशासन विभागाने विशेष मोहीम राबवत राज्यात ९४ ठिकाणी छापे टाकले. यामध्ये बृहन्मुंबईतील २६ ठिकाणी छापे टाकून ६७ प्रकारची औषधे जप्त केली असून, कोकण विभागात २२ छाप्यांत ६० प्रकारची उत्पादने, पुणे विभागातील १५ छाप्यांत १५ उत्पादने, नाशिक विभागातील ११ छाप्यांत १५ उत्पादने, औरंगाबादमध्ये ८ छापे व ४५ उत्पादने, अमरावतीमध्ये ६ छाप्यांत १३ उत्पादने, नागपूरमध्ये ६ छाप्यांत ४८ उत्पादने जप्त केली आहेत.या छाप्यांमध्ये विविध आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या शुगर लॉक सिरप, अभय मेदारी स्लिम फिट कॅप्सूल, फॅटगो कॅप्सूल, व्ही-स्लिम कॅप्सूल, ३०३ कॅप्सूल, शुगर नाशक वटी, माय फेअर क्रीम, आरव्ही कॅप्स, डायमेडिका प्युअर आयुर्वेदिक प्रॉडक्ट, अश्वतुल-डीएक्स कॅप्सूल, लाँग हाईट एक्स्ट्रा स्ट्राँग कॅप्सूल, फॅट क्यूअर रस, लूक लाईक आदी विविध प्रकारच्या औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)
दीड कोटीची औषधे जप्त
By admin | Updated: October 4, 2016 05:10 IST