Join us

साडेअकरा लाख मजुरांनी सोडली मुंबई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:06 IST

एप्रिलमधील आकडेवारी; उत्तर, पूर्वेकडील राज्यांसाठी धावल्या ५०२ ट्रेनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ...

एप्रिलमधील आकडेवारी; उत्तर, पूर्वेकडील राज्यांसाठी धावल्या ५०२ ट्रेन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन लावण्यात आले आहे. कोरोना आणि लॉकडाऊनची भीती यामुळे एप्रिल महिन्यात आतापर्यंत ११ लाख ४९ हजार मजुरांनी मुंबई सोडली. दरम्यान १ ते २१ एप्रिल या २१ दिवसांत उत्तर आणि पूर्वेकडील राज्यांसाठी मध्य रेल्वेने २५० तर पश्चिम रेल्वेने २५२ अशा एकूण ५०२ ट्रेन चालविल्या आहेत.

काेरोनाच्या भीतीमुळे मुंबईत काम करणारे असंख्य मजूर पुन्हा आपल्या गावाकडे गेले आहेत. मजुरांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने माेठ्या प्रमाणात स्पेशल ट्रेन चालविल्या. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मध्य रेल्वेच्या लाेकमान्य टिळक टर्मिनसच्या परिसरात मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली हाेती. काेराेनाच्या संक्रमणामुळे फक्त आरक्षित तिकीट असलेल्यांनाच टर्मिनस मध्ये प्रवेश मिळत असल्याने, वेटिंग तिकीट असलेल्यांची स्थानकाबाहेर गर्दी हाेती. लाेकमान्य टिळक टर्मिनस येथून उत्तर प्रदेश, बिहार, पटना, झारखंड, गाेरखपूर, वाराणसी, पश्चिम बंगाल, चेन्नई करिता दरराेज २० ते २२ गाड्या चालविण्यात आल्या.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, एलटीटी, दादर, पनवेल या स्थानकात लांब पल्ल्याच्या ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग केले जाते. तसेच प्रवाशांच्या सामानाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सीएसएमटी, एलटीटी स्थानकात विशेष सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. याशिवाय स्थानकात तैनात आरपीएफ जवान आरक्षित तिकीट असलेल्यांना साेशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करुन रांगेत साेडतात . पश्चिम रेल्वेच्या २८ स्थानकातील प्रवेशद्वारावर आरपीएफ तैनात आहेत. अनधिकृत प्रवाशांना आळा घालण्यासाठी टर्मिनस मध्ये वारंवार गस्त घातली जाते.

* उत्तर प्रदेश, बिहार, गाेरखपूर, पटणासाठी सर्वाधिक गाड्या

मध्य रेल्वे प्रशासनाने १ ते २० एप्रिल दरम्यान उत्तर आणि पूर्वेकडील राज्यासाठी २५० गाड्या चालविल्या. त्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, गाेरखपूर, पटणासाठी सर्वाधिक गाड्या चालविण्यात आल्या. या गाड्यांमधून ४ लाख ०२ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. तर पश्चिम रेल्वेवरून १ ते २१ एप्रिल या कालावधीत उत्तर-पूर्वेकडील राज्यांसाठी २५२ स्पेशल ट्रेन आणि ४७ उन्हाळी स्पेशल ट्रेन चालविल्या. या गाड्यांमधून ७ लाख ४७ हजार प्रवाशांनी आपले गाव गाठले. पश्चिम रेल्वे मार्गावरुन १६ एप्रिल राेजी एका दिवसात ११९ ट्रेन साेडण्यात आल्या. त्यातील ३९ ट्रेन उत्तर-पूर्व राज्यात गेल्या.

-------------------------