Join us

माथेरानमध्ये वृक्षारोपण एकदा, वृक्षतोड ‘वर्षभर’

By admin | Updated: September 12, 2014 23:51 IST

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन ही काळाची गरज लक्षात घेऊन प्रशासनाला जाग आली

माथेरान : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन ही काळाची गरज लक्षात घेऊन प्रशासनाला जाग आली आणि येथे जुलै महिन्यात नगरपरिषदेने वृक्षदिंडी काढून एकूण पंधराशे रोपे लावली, तसेच वनविभागाने यात सहभागी होऊन पाचशे रोपे लावली. नागरिकांना देखील रोपे वाटण्यात आली. माथेरानसारख्या पर्यटनस्थळावर वृक्षारोपण वर्षातून एकदाच केले जाते, परंतु वृक्षतोड बाराही महिने सर्रासपणे सुरू असते. याकडे वनविभाग डोळेझाक करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वृक्षतोडीचे प्रमाण सर्वाधिक दस्तुरी नाका परिसर, वॉटरपाईप रेल्वे स्थानक आणि पॅनोरमा पॉर्इंटच्या पायथ्यालगत असून दररोज घाटरस्त्यातून भरदिवसा लाकडांच्या मोळ्यांची वाहतूक सुरू असते. वनविभागाचे कर्मचारी याकडे डोळेझाक करताना दिसतात. येथील घरांना अडचण ठरणारे वृक्ष देखील केवळ दोन तीन फुटांच्या जागेसाठी मुळासकट छाटले जात आहेत. धोकादायक झाडांचा फक्त विस्तार कमी करण्याऐवजी संपूर्ण जिवंत झाडे छाटली जातात. तर नव्याने बांधलेली हॉटेल्स तसेच बांधकामाच्या वेळी संपूर्ण झाडे नामशेष केली जात आहेत. जंगलातील जिवंत तोडलेली झाडे ठरावीक हॉटेलला नियमितपणे पुरविली जात आहेत. दस्तुरी नाका घोडा स्टँड तर उजाड मैदान झाले आहे. घोड्यांच्या मलमुत्रामुळे तसेच झाडांना घोडे बांधले जात असून झाडांची साल खाल्ल्याने वनराई संपुष्टात आली आहे. माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर दोन दशकांपूर्वी गर्द वनराई अस्तित्वात होती. वातानुकूलित हवा अंगाला सुखद स्पर्श करायची तो गारवाच आता नाहीसा झाला आहे. दरवर्षी येथे मोलमजुरी करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळे झोपडपट्टी परिसर वाढत असून वृक्षतोड अधिकाधिक होत आहे. (वार्ताहर)