Join us  

१०० व्या नाट्य संमेलनानिमित्त महाराष्ट्रभर होणार 'नाट्यकलेचा जागर'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 5:40 PM

एकांकिका, बालनाट्य, एकपात्री, नाट्य अभिवाचन, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन स्पर्धांची मेजवानी

मुंबई - मराठी रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने १००व्या नाट्य संमेलनाची जोरदार तयारी सुरू आहे. शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जानेवारी २०२४ ते मे २०२४ या कालावधीत धुमधडाक्यात साजरे होणार आहे. या निमित्त महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील कलावंत, नाट्यकर्मींसाठी 'नाट्यकलेचा जागर' हा स्पर्धात्मक महोत्सव दिनांक १५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. 

'नाट्यकलेचा जागर' हा उपक्रम १००व्या नाट्य संमेलनातील नावीन्यपूर्ण भाग असल्याने यात महाराष्ट्रातील सर्व कलावंतांनी भाग घेण्याचे आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केले आहे. हा स्पर्धात्मक महोत्सव महाराष्ट्रातील रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, बीड, नांदेड, लातूर, औरंगाबाद, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वाशिम, ठाणे, नवी मुंबई, मुंबई आदी २२ केंद्रांवर होणार आहे.

यात एकांकिका स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, एकपात्री स्पर्धा, नाट्य अभिवाचन स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा होणार आहेत.  या स्पर्धा प्राथमिक, उपांत्य व अंतिम अशा तीन फेऱ्यांमध्ये होतील. १५ जानेवारीपासून प्राथमिक फेरी सुरू होऊन यातील निवडक कलाकृतींची उपांत्य फेरी घेण्यात येईल. त्यानंतर मुंबईत अंतिम फेरी होईल. अंतिम फेरीत निवडलेल्या कलावंतांसाठी चार दिवसीय नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. हे शिबिर नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री घेणार आहेत. 

व्यावसायिक कलावंतांबरोबर प्रथमच महाराष्ट्रातील सर्व गुणवंत कलाकारांना १०० व्या नाट्यसंमेलनात आपली कला सादर करण्याची संधी या नाट्यकलेचा जागरमधून मिळणार आहे. यासाठी सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट, उत्तम आणि उत्तेजनार्थ अशी दोन लाख रुपयांपासून २५०० रुपयांपर्यंत लाखों रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. सर्व स्पर्धांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच होणार असून, नाट्यपरिषदेच्या लिंकवर विविध स्पर्धांची माहिती व नियामवली उपलब्ध आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि वेळ दिनांक ३१ डिसेंबर २०२३ सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे.

टॅग्स :मराठी साहित्य संमेलन