Join us  

Omicron Variant: ‘ओमायक्रॉन’ची मुंबईत एन्ट्री; महाराष्ट्रात एकूण १० रुग्ण आढळले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2021 5:27 AM

सोमवारी दोन रुग्णांचे निदान, दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथून २५ नोव्हेंबर रोजी मुंबईत आलेल्या एका ३७ वर्षीय पुरुषाला ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

मुंबई :  राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, सोमवारी मुंबईतील आणखी दोन जणांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता दहा झाली आहे. ओमायक्रॉन आता मुंबईत दाखल झाल्याने मुंबई महानगरपालिका सतर्क झाली आहे.

दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथून २५ नोव्हेंबर रोजी मुंबईत आलेल्या एका ३७ वर्षीय पुरुषाला ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले आहे. या रुग्णासोबत राहिलेल्या व त्याच दिवशी अमेरिकेहून आलेल्या त्याच्या ३६ वर्षीय मैत्रिणीला देखील या विषाणूची बाधा झाल्याचे प्रयोगशाळा अहवालातून समोर आले आहे. या दोघांना कोणतीही लक्षणे नाहीत, हे दोन्ही रुग्ण सेव्हन हिल्स रुग्णालयात भरती आहेत. या दोन्ही रुग्णांनी फायझर लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. या दोन्ही रुग्णांच्या ५ अतिजोखमीच्या आणि ३१५ कमी जोखमीच्या निकटसहवासितांचा शोध घेण्यात आलेला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता व्यवहारात कोविड अनुरूप वर्तनाचा अंगीकार करावा. तसेच महिन्याभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून परतले आहेत त्यांनीही आपल्याबाबत आरोग्य विभागास माहिती द्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

कोविड चाचण्यांत वाढकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आला असताना आता ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटची दहशत निर्माण झाली आहे. परदेशातून आलेले आतापर्यंत १९ प्रवासी कोविड बाधित असल्याचे आढळून आले आहे, तर त्यांच्या संपर्कातील ६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जास्त लोकांची चाचणी, तत्काळ निदान व त्यांच्या संपर्कातील लोकांचे विलगीकरण यावर महापालिकेने पुन्हा भर दिला आहे. त्यानुसार चाचणीचे प्रमाण वाढवून दररोज सरासरी ३५ ते ४० हजार चाचण्या केल्या जात आहेत. 

३४ नमुने जनुकीय तपासणीसाठी : राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरू आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ३४ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 

टॅग्स :ओमायक्रॉनकोरोना वायरस बातम्या