कल्याण : तुम्हाला नको असलेल्या वस्तू झटपट पध्दतीने विकण्यासाठी ‘ओएलएक्स’या माध्यमाची जाहिरात सध्या टिव्हीवर चांगलीच गाजत असताना कल्याणात एका भामटयाने तर या ओएलएक्स च्या माध्यमातून तब्बल 15 जणांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. अजय शेट्टी (वय 34) असे या अनोख्या चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भामटयाचे नाव असून त्याने चोरलेले 15 महागडे मोबाइल एमएफसी पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
अजय हा नेवाळी नाका परिसरात राहणारा असून मोबाइल विकण्यासाठी ओएलएक्सवर जाहीरात प्रसिध्द होताच कमी हिटस मिळालेल्या मोबाइल धारक ांशी तो संपर्क साधायचा. त्यांना कल्याण रेल्वे स्थानकानजिकच्या हॉटेलमध्ये बोलवायचा. हॉटेलमध्ये येताना कागदांनी भरलेली मोठी बॅग आणायचा आणि ती बॅग तेथेच ठेवून समोरील ग्राहकाच्या मोबाइलची रेंज चेक करण्याचा बहाणा करीत हॉटेलमधून पसार व्हायचा.
अशाप्रकारच्या एका फसवणुकीची तक्रार एमएफसी पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिसांनीच आपला मोबाइल विकण्याचा बहाणा करून ओएलएक्सवर जाहीरात प्रसिध्द करून त्याला हॉटेल परिसरात बोलावून घेतले. दरम्यान पोलिसांच्या सापळयात अडकल्याचे लक्षात येताच शेट्टीने पळण्याचा प्रयत्न केला यात पोलिस हवालदार अनुप कामत आणि एस. के गावित यांनी पाठलाग करून पकडून त्याच्याकडून 3 लाखाचा मुद्देमाल जप्त केला़ सोशल नेटवर्किगच्या माध्यमातून गंडा घालण्याचे प्रकार सर्रास घडत असताना ओएलएक्सच्या माध्यमातून आणखी एका चोरीच्या अनोख्या प्रकाराची भर पडली आहे. (प्रतिनिधी )
अशी सुचली आयडियाची कल्पना़़़
आपला मोबाईल विकण्यासाठी ओएलएक्सची मदत घेतलेल्या अजयला अशाच पध्दतीने एकाने 6 महिन्यापूर्वी गंडा घातला होता. यातूनच त्याला अशाप्रकारे मोबाईल चोरीची कल्पना सुचली . चोरलेले मोबाईल मित्रंच्या मदतीने विकण्याचा त्याचा प्रय} होता. हे सर्व मोबाईल हस्तगत केल्याची माहीती वरीष्ठ पोलिस निरिक्षक दिनेश कटके यांनी दिली.