लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मानखुर्द येथील रेल्वे स्थानकाचे फलाट क्रमांक ३ हे स्थानकापासून थोड्या अंतरावर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे फलाट रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्षित होते. फलाटावर सर्वत्र खड्डे पडले आहेत. लाद्या उखडलेल्या असून, छत गळत होते, परंतु गेल्या काही दिवसांपासून या फलाटाच्या पुनर्विकासाचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या फलाटाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याचे पाहून प्रवाशांना सुखद धक्का बसला आहे.हार्बर रेल्वेच्या विस्तारापूर्वी मानखुर्द हे हार्बर मार्गावरील अखेरचे रेल्वे स्थानक होते, तेव्हा दोन फलाट असलेल्या मानखुर्द स्थानकात कुर्ला आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून गाड्यांची ये-जा होती. मानखुर्द स्थानकात उतरून प्रवासी वाशी, कोपरखैरणे, उरण, नेरूळ आणि इतर ठिकाणी एसटीने जात होते, परंतु हार्बर रेल्वेचा पनवेलपर्यंत विस्तार झाला.त्याच दरम्यान मानखुर्द स्थानकही हलविण्यात आले. शेजारी फलाट क्रमांक १ आणि २ बांधण्यात आले. त्यामुळे जुन्या स्थानकाचा (आताचे फलाट क्रमांक ३) वापर कमी झाला. सद्य:स्थितीमध्ये सकाळी ८.०४ आणि ८.५२ वाजता २ लोकल जुन्या स्थानकात थांबतात आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जातात. फलाटाच्या नूतनीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. फलाटाची लांबी १२ डब्यांच्या गाडीइतकी करण्यात येणार आहे, तसेच फलाटावर नवे छत बसविण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाºयांनी दिली.अभ्यासाची जागाजुन्या मानखुर्द स्थानकात दररोज सकाळी फक्त दोन लोकल थांबतात. त्यानंतर, दिवसभर या स्थानकात गाड्यांची ये-जा नसते. त्यामुळे स्थानक परिसर सुना असतो. त्यामुळे आसपासच्या परिसरातील झोपडपट्ट्यांध्ये राहणारी शाळकरी, महाविद्यालयांमध्ये शिकणारी मुले अभ्यास करण्यासाठी येथे येतात. रात्री अभ्यास करण्यासाठी येणाºयांची संख्या खूपच मोठी अधिक असते. दहावी, बारावीच्या परीक्षा काळात या स्थानकाला अभ्यासिकेचे स्वरूप प्राप्त होते.स्थानकाच्या एका बाजूला अभ्यास करणारी मुले, तर दुसºया बाजूला गर्दुल्ले दिवसभर असतात. अनेकदा गर्दुल्ल्यांमुळे प्रवासी आणि स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. स्थानकाच्या नूतनीकरणानंतर स्थानक परिसरात गर्दुल्ल्यांचा वावर होणार नाही, याची रेल्वे पोलिसांनी दक्षता घ्यावी, असे मत प्रवाशांनी मांडले.
‘जुन्या मानखुर्द’ला नवसंजीवनी, स्थानकाचा होणार कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 06:50 IST