Join us

जुन्या वसतिगृहाला सुरक्षारक्षकच नाही

By admin | Updated: May 20, 2014 02:45 IST

केईएम रुग्णालयातील जुन्या वसतिगृहाचे नूतनीकरण केले असून, निवासी पुरुष डॉक्टरांना त्या वसतिगृहामध्ये राहण्यास जागा दिल्या आहेत.

मुंबई : केईएम रुग्णालयातील जुन्या वसतिगृहाचे नूतनीकरण केले असून, निवासी पुरुष डॉक्टरांना त्या वसतिगृहामध्ये राहण्यास जागा दिल्या आहेत. मार्च महिन्यापासून निवासी पुरुष डॉक्टर या वसतिगृहात राहायला आले. मात्र अडीच महिने उलटूनही तिथे सुरक्षारक्षक नाही आणि पिण्याच्या पाण्याची सोयही केलेली नाही. केईएम रुग्णालयाच्या जुन्या इमारतीला लागूनच हे वसतिगृह आहे. बालरोगचिकित्सा वॉर्ड क्रमांक १च्या पुढच्या रस्त्याला जोडूनच या वसतिगृहाचे प्रवेशद्वार आहे. या वसतिगृहामध्ये ७७ खोल्या असून, एकूण १५४ निवासी डॉक्टर येथे राहतात. केईएम रुग्णालयामध्ये बांधलेल्या नवीन इमारतीजवळ सुरक्षारक्षक आहे. मात्र जुन्या वसतिगृहाजवळ अजून एकही सुरक्षारक्षक दिलेला नाही. रुग्णालयाच्या इमारतीला लागूनच वसतिगृह असून, मध्ये एक लोखंडी दार आहे. हे दार दिवसभर उघडे असते. निवासी डॉक्टर सकाळीच बाह्यरुग्ण विभागामध्ये जातात. यानंतर या वसतिगृहामध्ये कोणी निवासी डॉक्टर नसतात. या वसतिगृहाला सुरक्षारक्षक नसल्यामुळे येथे कोणालाही सहज प्रवेश मिळतो. यामुळे अनेकदा रुग्णांचे नातेवाईक वसतिगृहामध्ये ये - जा करीत असतात. रुग्णांचे नातेवाईक येथील तळमजल्यावरील प्रसाधनगृहाचा वापरही करतात. प्रसाधनगृहाची दारे ही दिवस-रात्र सताड उघडी असतात. ही दारे बंद केली जात नसल्यामुळेच रुग्णांच्या नातेवाइकांचा वावर वाढलेला आहे. येथे यायला कोणालाच निर्बंध नसल्यामुळे निवासी डॉक्टर त्रस्त झाले आहेत. पहिले काही दिवस प्रसाधनगृहांमध्ये नियमित पाणी येत नव्हते. आता नियमित पाणी यायला लागले आहे. मात्र अजूनही गरम पाण्याची सोय नाही. (प्रतिनिधी)