Join us
Daily Top 2Weekly Top 5

तेलाचा टँकर नदीत कोसळला

By admin | Updated: January 1, 2015 23:01 IST

खालापूर तालुक्यातील नवीन वर्षाची सुरुवात जल्लोषात होत असताना अवघ्या काही तासात पाताळगंगा नदीच्या पात्रात तेलाचा टँकर उलटून अपघात झाला.

वावोशी : खालापूर तालुक्यातील नवीन वर्षाची सुरुवात जल्लोषात होत असताना अवघ्या काही तासात पाताळगंगा नदीच्या पात्रात तेलाचा टँकर उलटून अपघात झाला. खालापूर बाजूकडे द्रुतगती महामार्गावरून अमरावतीस जाण्यासाठी निघालेल्या पामतेलाने भरलेला टँकर समोरून येणाऱ्या टे्रलरने हुलकावणी दिल्याने नदीपात्रात कोसळला. या टँकरमधील चालक बचावला पण, जवळपास सोळा टन तेलगळती होवून पाण्यात वाहून गेले. त्यामुळे नदीचे पात्रही तेलकट झाल्याची घटना मध्यरात्री घडली. चालकाने दिलेल्या माहितीनुसार, टँकर (एम.एच. ४ सी. टी. ४८९५) हा चालक जजबीर सिंग (२३, रा. मुंबई) हा जेएनपीटीमधून १६ टन पामतेल घेऊन निघाला होता. रात्री सव्वाएकच्या सुमारास खालापूरवरून अमरावतीला जाण्यासाठी द्रुतगती मागावरून सावरोली व खालापूरच्या मध्यभागी असणाऱ्या पाताळगंगा नदीजवळ आल्यावर समोरून येणाऱ्या टे्रलरने हुलकावणी दिल्याने अपघात टाळण्यासाठी टँकर चालक जजबीर सिंग याने टँकर वळवण्याचा प्रयत्न केला असता, पुलाचा कठडा तोडून टँकर नदीत कोसळला. यावेळी सुमारे १६ टन पामतेल गळती झाल्याने नदीच्या पात्रात तेलाचा तवंग पसरला होता. (वार्ताहर)