Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनाप्रमुखांचे तैलचित्र मंत्रालय व विधानभवन परिसरात लावावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचा विचार कानाकोपऱ्यातल्या माणसांपर्यंत पोहोचवून आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्वाचे चैतन्य निर्माण केले. शिवसेनाप्रमुख ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचा विचार कानाकोपऱ्यातल्या माणसांपर्यंत पोहोचवून आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्वाचे चैतन्य निर्माण केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची येत्या २३ जानेवारीला जयंती आहे. त्यापूर्वी शिवसेनाप्रमुखांचे तैलचित्र मंत्रालय व विधानभवन परिसरात लावावे, अशी मागणी उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे. कांदिवली पश्चिम येथील पोयसर जिमखान्यात २३ जानेवारीला शिवसेनाप्रमुख व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती संयुक्तपणे आपण स्वतः साजरी करतो, असेदेखील त्यांनी पत्रात नमूद केले.

भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली नसल्याने सोशल मीडियावर टीकास्त्र सोडण्यात आले होते. या श्रेणीत आपण स्वतःला जोडून घेत नाही, हे त्यांनी स्पष्ट केले.

वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय नेते मुंबईत आल्यावर मातोश्रीवर येऊन शिवसेनाप्रमुखांना भेटत असत. या दोन महान नेत्यांची भेट म्हणजे राष्ट्रीय विचारांचे मिलन असे कोट्यवधी राष्ट्रप्रेमींना वाटायचे. हिंदुत्व म्हणजे या गौरवशाली देशाची केवळ ओळखच नाही, तर या महान देशाचा श्वास, नाडी व आत्माच आहे. भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी आपल्या पद व प्रतिष्ठेचा विचार न करता, ते हिंदुत्व बळकट करण्यासाठी गेली २५ वर्षे प्रयत्नशील राहिले.

अटलबिहारी वाजपेयी हे हिंदुत्वाचे प्रतीकच होते तसेच ते प्रखर राष्ट्रप्रेमींचे अग्रणी मानले जातात. या नेत्यांचा सन्मान आज आपण सर्वांनी केला, तर उद्याची पिढी या नेत्यांचा मान-सन्मान राखील, असे खासदार शेट्टी यांनी पत्रात शेवटी नमूद केले.

-------------------------